
फ्लोरिडा मधील एका ‘खाद्य वस्तू भाजी भांडार’ म्हणजे ग्रोसरी स्टोअरमध्ये सामान भरून पैसे देण्याच्या रांगेत मी उभी होते. माझ्या आधीच्या बाईचे सामान प्लास्टिक पिशव्यात भरून दिले जात होते. . 25 एक पिशव्या भरल्या असतील . त्या पिशव्या पाहून माझा पर्यावरण प्रेमी जीव थोडा थोडा होत होता. माझा नंबर लागला तेव्हा मी पटकन माझ्याकडच्या दोन तीन कापडी पिशव्या पुढे केल्या!
त्या बाईने मागे वळून पाहिले आणि माझ्याकडे विचित्र कटाक्ष टाकला ! तेव्हा मीच तिला हसत म्हणाले, “ मी कॅलिफोर्नियाची आहे. आमच्या राज्यात प्लास्टिक पिशव्यांचा कायदा आहे. त्यामुळे मला घरून कापडी पिशव्या आणायची सवय आहे. “
मी उत्तर दिले तेव्हा मला आठवण झाली ती तीस चाळीस वर्षांपूर्वीची ! भारतातून नुकत्याच आणि प्रथमच आलेल्या माझ्या शेजारणीला बरोबर घेऊन मी भाजी आणायला जाणार होते. ती आपली आली हातात पिशवी घेऊन ! तेव्हा मी तिच्याकडे अस्साच विचित्र कटाक्ष टाकला होता. म्हणजे सवयीची थेट पृथ्वी प्रदक्षिणाच झाली की !
गंमत म्हणजे मीसुद्धा पुण्यात असताना , लहानपणी भाजीला जाताना हातात कापडी पिशवीच घेऊन जात असे ! लहानपणी कापडाच्या पिशव्या, काग दात मिळणारी भेळ, झाडाच्या पानात बांधलेले फुलांचे पुडे हे सर्रास दिसत असे. वहीचे न वापरलेले कागद फाडून त्यांच्या नव्या वह्या शिवत असत. कोकणात तर निसर्ग अभिमुखता पदोपदी असे. घरातला ओला कचरा साठवून आणि सांडपाणी वापरून त्यावर भाजीचा मळा फुलत असे.घरापुढे मांडव असे तो झाडांची पाने वापरून बांधलेला. . केळीची पाने नाहीतर पत्रावळी वर जेवण असे. मग ती पाने गाई म्हशींच्या तोंडात जात. वाया म्हणून काही जात नसे. गुरांच्या शेणाने जमिनी सारवल्या जात. आजी जुन्या लुगड्याच्या गोधड्या शिवत असे.तिथले सर्वच रहाणीमान निसर्गचक्राशी बांधलेले.
या सवयी घेऊन अमेरिकेत आल्यावर ‘इथे सगळीच नवलाई । दुकानात हात हलवत जाई।’ कारण टाचणीपासून हत्तीपर्यंत सर्वच गोष्टी कागदी खोक्यात नाहीतर प्लास्टिक आवरणात बांधून मिळत. नेण्यासाठी लहान मोठ्या प्लास्टिक पिशव्या ! घ्या आणि टाका असा खाक्या !
दुधासाठी कागदी खोके नाहीतर प्लास्टिकच्या च्या बरण्या असत. तेव्हा ‘जीव थोडा थोडा होई’, टाकायला. “ हो बाई ! एवढी छान बरणी फेकून कशाला द्यायची” असं म्हणत ती साठवली जात असे. सुरवातीला काही दिवस त्या बरण्या अर्ध्या कापून त्यांचा कुंडी सारखा उपयोग करून त्यात झाडे लावण्याचे प्रयोग होत असत. पण दर आठवड्याला वाणसामानातून येणार्या या डबे बरण्याचा साठा इतका होई; की एक दिवस ‘त्या’ जिवाचा धडा करून ते सगळं कचऱ्यात टाकावं लागे. हळूहळू ‘तो’ जीव निर्ढावला आणि प्लास्टिक वापरून ते धडाधड कचरा टाकण्याची सवय लागून गेली ! थरमोकॉल आणि प्लास्टिक यांच्या बशा पेले वापरून पार्ट्या करण्याची चटक लागली. या देशाच्या कचऱ्यात जाणाऱ्या कागदात आणखी एक देश जगेल असे म्हणणारा ‘तो’ जीव बिनधास्तपणे कागदाची रिमे च्या रिमे कचऱ्यात जमा करू लागला. एवढेच नव्हे तर “आपण एकेकाळी प्लास्टिक, नायलॉन अशा उपयुक्त गोष्टींशिवाय जगत तरी कसे होतो” अशा विचारांचं अवलंबित्वही आलं, . माणसांना म्हणजे अख्या देशालाच !
मग हळूहळू ‘कागद वाचवा झाडे जगवा’ असे पर्यारवण प्रेमी विचार अमेरिकेत आणि तथाकथित सुधारलेल्या देशात होऊ लागले. काही लोक कागदी कचरा टाकण्यासाठी वेगळे डबे करा असा आग्रह धरू लागले शाळेतले विद्यार्थी घरोघरची रद्दी गोळा करून ती पुनर्वापर म्हणजे रिसायकल केंद्रात विकून शाळेच्या उपक्रमांसाठी पैसे जमवताना दिसू लागले. पर्यावरणाचा करताना कचरा नियोजन ,व्यवस्थापन, पुनर्वापर, निर्मूलन, आणि धोकादायक व टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे मार्ग या सर्वांवर एकत्रित विचार करण्याची गरज वाटू लागली. इलेक्ट्रॉनिक कचरा, न वापरलेली औषधे, रुग्णालयातील कचरा, वापरून उरलेली रसायने यांच्या योग्य विल्हेवाटीचे प्रयत्न सुरू झाले.
प्लास्टिक बंदी आणि पुनर्वापर ( रिसायकलिंग ) यासाठी साठी पद्धतशीर प्रयत्न करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील पहिले राज्य.
शाळाशाळांतून पाण्याच्या बाटल्या भरून घेण्यासाठी यंत्रणा ठेवली जाऊ लागली. त्यातून प्लास्टिक बाटल्यांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
गावागावातील नगरपालिकांनी कागद, कोरडा कचरा,हिरवा कचरा, पुनर्वापर कचरा ,ओला (आणि बायोडिग्रे डेबल) कचरा असे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना कचऱ्याचे डबे दिले. पुनर्वापराच्या दुधाच्या प्लास्टिक बरण्या किंवा खाद्यपदार्थांचे डबे कचऱ्या त टाकण्यापूर्वी धुवून , स्वच्छ करून घ्यावे लागतात. सुरवातीला सुखवस्तू आळशी मनांना त्याचा कंटाळा येई. पण मग पर्यावरण प्रेम, कर्तव्यबुद्धी इ. भावनांचे मोर्चे आळसावर धाडी घालू लागले. दूरदर्शन, मासिकातील लेख आणि माहितीचा मारा यामुळे टप्प्याटप्प्यानी ‘बिघडलेलें लोक ‘घडू’ लागले.
सगळेच प्लास्टिक पुनर्वापरायोग्य नसते. डब्यांच्या मागे त्यासंबंधी खुणा असतात. याचेही प्रशिक्षण यथावकाश झाले .
कॉफीचे कागदी कप कागदी कचऱ्याबरोबर जातात अशी समजूत चुकीची असू शकते. कारण या कपावर पातळ प्लास्टिक चे आवरण असते, हे लोकशिक्षण होण्यासही वेळ लागला.
प्लास्टिक पिशव्या पुनर्वापरायोग्य कचर्यात टाकल्या तर त्यामुळे कचरा सुव्यवस्थापन यंत्रात अडकून ती यंत्रणाच तुंबते व प्रश्न येतात. तेव्हा त्या पिशव्या त्यासाठी मुद्दाम ठेवलेल्या डब्यातच टाकाव्यात ही माहिती नीट समजण्यास काहीसा वेळच लागला.
1991 मध्ये प्लास्टिक पॅकेजिंग कंटेनर संबंधी चा कायदा या राज्यात झाला. .काही पर्यावरणप्रेमी भा जी भांडारे कागदाच्या पिशव्या देऊ लागली. एवढेच नव्हे तर “तुमच्या कापडी पिशव्या आणा” असे प्रोत्साहन देवून त्या दुकानांनी कागद वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. नंतर काही ग्रोसरी दुकानांनी ग्राहकांना सांगितले की, “ तुम्ही तुमची स्वतःची पिशवी आणल्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहन म्हणून प्रत्येक पिशवीमागे काही पैसे परत देऊ.”
2016 मध्ये कॅलिफोर्नियात असा कायदा झाला की दुकानदारांनी ग्राहकांना पुनर्वापर करता येण्यासारख्या पिशव्या विकत द्याव्यात किंवा ग्राहकाला सामान भरण्यासाठी प्लास्टिक पिशवी दिली तर दिलेल्या प्रत्येक प्लास्टिक पिशवी मागे किमान 10 सेंट लावावेत. म्हणजे थोडक्यात; तुमची पिशवी तुम्ही न्यायला विसरलात तर दुकानदार तुमची गैरसोय करत नाहीत. पण तुम्हाला त्याबद्दल भुर्दंड पडतो ! त्यामुळे हळू हळू ग्राहकांना आपापल्या पिशव्या भाजीला नेण्याची सवय लागली. प्लस्टिक वापर कमी झाला. अर्थात दुकानात सुट्या पालेभाज्या , फळे इत्यादी भरण्यासाठी त्या-त्या विभागात प्लास्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या असतात. इतर वस्तूंच्या दुकानात वस्तूंवर प्लास्टिकची आवरणे वापरलेली असतात. तेव्हा हा प्रश्न अजून पूर्ण सुटला नाही.
असाच प्रश्न उपहार गृहात येत असतो लोक जेवल्यानंतर उरलेले पदार्थ घरी घेऊन जाऊ शकतात. आता हे अन्न देण्यासाठी प्लास्टिक अथवा स्टायरो फोम चे डबे वापरले जातात यावर उपाय काय ? ‘गि र्हाइकांचा संतोष हाच आमचा फायदा’ असे ब्रीद असल्यामुळे “आता तुम्ही आपापले डबे घेऊन या” असे सांगणे शक्य नाही. . तसेच “ सगळं. संपवयाच हं ! घरी काही न्यायचां नाही. आम्ही उरल्या सुरल्याला डबे देत नसतो. ” अशी प्रेमळ पाटी लावणे इथे जमणार नाही. काही शहरात स्टायरोफोमचे डबे बाद केले आहेत. तिथे प्लास्टिक डबे हा उपाय उरतो. म्हणजे प्लास्टिक कचरा वाढतो ! (काही ठिकाणी कागदी डबे देण्याचा प्रयत्न होतो. )
नॉर्थ कॅरोलीनातील क्रिस्टल ड्रेसबँक नावाच्या पर्यावरण प्रेमी महिलेला या प्लास्टिक आणि स्टायरोफॉम कचऱ्याचा उबग आला. सॅन फ्रान्सिस्को शहरात स्टायरोफोमचे डबे बाद केल्याची बातमी क्रिस्टल ने वाचली. तेव्हा आपल्या गावातील स्थानिक कारभाऱ्यांना तिने असे प्रयत्न करण्याची विनंती केली. पण ब्युरोक्रसीमध्ये तिचे कागदी घोडे अडकून पडले.
तेव्हा तिने स्वतः एमी टेलर नावाच्या दुसऱ्या महिलेबरोबर भागीदारीत ‘ग्रीन टु गो’ नावाची संस्था स्थापन केली या संस्थेने उपहारगृहं बरोबर सहकार्याने काम सुरू केले. त्याची थोडक्यात कल्पना अशी की या उपहारगृहानी पुनर्वापर करण्यासारख्या प्लास्टिक डब्यात पदार्थ भरून द्यायचे. ग्राहकांनी आपले काम झाल्यावर रिकामे झालेले डबे ‘ग्रीन टू गो’ या संस्थेच्या ’ ग्रीन टू गो’ नावाच्या कचरा डब्यात टाकायचे मग या संस्थेचे स्वयंसेवक डबे घेऊन जातात. ते डबे स्वच्छ धुवून निर्जंतुक करणारी यंत्रणा गावात असते. तेथे व्य वस्थित निर्जंतुक करून डबे पुन्हा उपहारगृहात परत पाठवले जातात. हा प्रयोग यशस्वी झाला तर आणखी गावात तो करण्याची योजना आहे संस्थेचे संकेतस्थळ http://www.greentogo.com आहे. ड्यूक विद्यापीठाने या प्रयोगावर संशोधन करून सिद्ध केले की असा एक डबा एक हजार टाकाऊ डब्यांचा कचरा वाचवू शकतो.
पाणी पिण्यासाठी जगात सगळीकडेच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बाटल्याबद्दलची आकडेवारी पाहिली की त्या प्रश्नाने आ वासला जातो ! एका प्लास्टिक बाटलीचे पूर्ण विघटन होण्यास सुमारे ४०० वर्षे लागतात या पृथ्वीतलावर दिवसाला एक मिलियन बाटल्या कचऱ्यात जातात !
तसाच प्रश्न पेयपानासाठी वापरल्या जाणाऱ्या नळ्यांचा आहे. नुसत्या अमेरिकेत दर दिवशी ५०० मिलियन नळ्या वापरून फेकल्या जातात. या प्रश्नाला वाचा फोडली एका “ sea turtle with a straw “ या यु ट्यूब व्हीडीओ ने !
जरी या नळ्या पुरावापर करता येणाऱ्या पॉलीप्रोपालिन पासून बनवलेल्या असल्या तरी त्या पुनर्वापर डब्यापर्यंत पोहोचतच नाहीत. त्या सरळ कचऱ्या त जातात. किंवा त्या इतक्या हलक्या असतात त्यांचे योग्य वर्गीकरण होण्याची यंत्रणा नसते. इ .स. १८०० मध्ये कागदी पेय नळ्या सुरु झाल्या. १९६०मध्ये प्लास्टिक पेयनळ्या तयार होऊ लागल्या.
तेव्हापासून हा प्रश्न आहे. आता अमेरिकेतील काही शहरात या नळ्या वर बंदी येत आहे. काही ठिकाणी या नळ्या मागितल्या तरच दिल्या जातात. तर काही ठिकाणी कागदी नळ्या वापरल्या जातात. स्टारबक्स सारख्या काही कंपन्या पेयनळ्या देणे बंद करणार आहेत. त्यांच्या कपांची जमीनदोस्त होणारी म्हणजे बायोडिग्रेडेबल झाकणे वापरल्याने नळ्या वापरण्याची गरज पडणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. (ज्यांना नळीनेच पेय घावे लागते अशा विकलांग लोकांचे काय असा नवा प्रश्न यातून निर्माण होऊ शकेल.. पण )
अमेरिकन माणूस दर दिवसाला सुमारे सरासरी साडेचार पाउंड प्लास्टिक कचरा टाकतो असे म्हणतात. अमेरिकेतील काही राज्यांनी हालचाल व कायदेकानू केले तरी अजून काही राज्यांनी प्लास्टिक वापरासाठी कायदे केले नाहीत याचा अर्थ अजून बराच प्लास्टिक कचरा समुद्रात जातो ! जगात बाकीचे देशही मागे नाहीत !
प्लास्टिक आणि इतर टिकावू पॉलिमर च्या कचऱ्याचा प्रश्न वस्तूंइतकाच टिकावू आणि आणि चिवट आहे !
श्रीमंत देशांच्या श्रीमंतीचे प्लास्टिक पाश जगासाठी शाप ठरले आहेत.
अमेरिकेतच नव्हे तर जगात हा प्रश्न आहे. १९६९मध्ये चंद्रावर पॉलिमर धाग्याचा झेंडा रोवून आपण हा प्रश्न चंद्रावरही नेला आहे. १९५०पासून आपण सुमारे ८ बिलियन टन एवढे पॉलिमर निर्माण करून पृथवी भोवती त्याचे चार विळखे होतील एवढा फास निर्माण केला आहे. यातील फक्त ९% प्लास्टिक पुन्हा वापरले गेले. ६० टक्के कचऱ्यात टाकले गेले. उरलेले अर्थातच समुद्रात गेले. या समुद्रात गेलेल्या पॉलिमरचे काय होते याचे एक प्रदर्शन मी अलास्कामध्ये पाहिले. सूर्य आणि समुद्रातील मीठ यामुळे या पॉलिथिनचे सूक्ष्म तुकडे होतात. त्यांच्याभोवती अन्य गोष्टी साचून त्यांची विषे तयार होतात. ते सर्व समुद्रातील जीवांच्या पोटात जाते. यातले काही समुद्रजीव “सी फूड” म्हणून माणसाच्या पोटात जातात. तज्ञाचे म्हणणे असे आहे की २०५० पर्यंत समुद्रातील प्लास्टिकचे प्रमाण माशांपेक्षा जास्त असेल ! जर दर वर्षी ८ मिलियन टन एवढे प्लास्टिक समुद्रात जात असेल तर हे भाकीत अपरिहार्य आहे !
‘पर्यवरण- पृथ्वी वाचवणे’ हा मोठा व्यापक विषय आहे, आणि प्लास्टिक व तत्सम पदार्थ हा त्याचा एक भाग आहे. त्यामुळे या जागतिक समस्येवर सर्व जगात विचार केला जात आहे. या विषारी प्रक्रियेचा जीव सृष्टीवर काय परिणाम होईल याची चिंता दहा युरोपियन लोकातील नऊ लोक करतात.ब्रिटनमधील अगदी भिन्न विचारांची दैनिकेसुद्धा या प्रश्नासा ठी हातमिळवणी करून लोकशिक्षण आणि प्रचार करत आहेत.
यावर एक चांगला उपाय काय तर प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे आणि ते कचऱ्यात न टाकता गोळा करून त्याची योग्य व्यवस्था करणे. कचराव्यवस्थापन हा प्रश्न प्लास्टिक इतकाच गंभीर होत जाणार आहे
त्यामुळे दोन्हीचा विचार एकत्रितपणे करावा लागतो.
श्रीमंत देशात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चांगली यंत्रणा असते. तिथे हे काम मुळातच सोपे असते. जनमानसाची जागृती करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी नाहीतर दंड या उपायांचा उपयोग चांगला होतो.
२०१८च्या जानेवारीपासून चीनने काही प्रकार च्या पुनर्वापरा योग्य प्लास्टिक कचऱ्याची आयात बंद केली. तसेच कचऱ्यातील अस्वच्छ प्लास्टिक साठी दंड लावणे सुरु केले. असा अस्वच्छ प्लास्टिक गोष्टी असलेला कंटेनर जर चीनने नाकारला तर तो अमेरिकेत परत पाठवणे इ . साठी सुमारे शंभर हजार डॉलर्सचा खर्च येतो. याचा अर्थ आपल्या कचऱ्याचा काही प्रश्न चीनवर ढकलणे आता अमेरिकेला व अन्य देशाना शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या यंत्रणेचे बळ वाढवावे लागेल. कदाचित त्यांना प्लास्टिक वेगळे करून त्याचे व्यवस्थापन कर णे आर्थिक दृष्ट्या सुखाचे होणार नाही.. मग ते प्लास्टिक जर अन्य कचऱ्याबरोबर गेले, तर काळाच्या ओघात सुमद्रात जाण्याची शक्यता वाढेल.
अर्थात चं अमेरिका व युरोप या देशातील प्रयत्न प्लास्टिकचा जागतिक प्रश्न सोडवू शकणार नाहीत. कारण प्लास्टिक प्रदूषण करणाऱ्या पहिल्या आठ देशातील सर्व देश आशियात आहेत ! समुद्रात जाणाऱ्या एकूण प्लॅस्टिकच्या दोन तृतीयांश प्लास्टिक या आठ देशातून जाते ! चीन अर्थातच या आठ देशातील एक देश आहे. पण त्यांना कचरा आणि प्लास्टिक निर्मूलनाची सुसज्ज यंत्रणा निर्माण करणे परवडणारे आहे.
व्हिएतनाम, थायलंड या देशात धड कचरा निर्मूलन व्यवस्था नाही आणि तिथे भारतासारखी भंगार , चिंध्या गोळा करण्याची मोठी उलाढाल होत नाही ( या उलाढालीमुळे भारताचा नंबर या आठ देशात अजून नाही; पण केव्हाही लागेल !) . तेव्हा प्रगत देशानी आपले पैसे आणि तंत्रज्ञान पणाला लावून आशियाई देशाना मदत करणे महत्वाचे होत आहे. कचरा व्यवस्थापना यंत्रणा, कायदे करण्यासाठी प्रयत्न , आणि मुख्य म्हणजे लोकशिक्षण व लोकजागृती हा सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवरचे प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे.
केनिया , बंगला देश यासारख्या मागास देशात प्लास्टिक बंदीचा उपयोग जास्त परिणामकारक होतो असे निरीक्षण आहे.
आपल्या लहानपणाच्या कोकणातले निसर्गचक्राशी सुसंगत साधे जीवन गेले . पण नवे तंत्रज्ञान आणि सुखसोयी यांचा वापर करून पर्यावरण आणि निसर्गचक्राची पायमल्ली न करता जीवन सुखाने घालवण्याचे नवे मार्ग असू शकतात.
सौर ऊर्जेचा वापर, घरातील सांडपाण्याला वेगळ्या पाईपद्वारे वाट काढून ते पाणी गावातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरवणे , ‘स्मार्ट घरे ‘बांधून ऊर्जेची बचत असे नवे पर्याय आता कॅलिफोर्नियातल्या लहान लहान गावात सुरु झाले आहेत. ( कॅलिफोर्निया मध्ये पाण्याचाही प्रश्न आहे!) . तसेच शाळांशाळांतून पर्यावरण विषयक जागृती साठी उपक्रम सुरु केले आहेत.
सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. पण पृथ्वीभोवतीचा प्लास्टिक फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे आणि समुद्रालाही गिळंकृत करत आहे हे सत्य प्रत्येकाने समजावून घेणे आणि जागरूकतेने प्लास्टिकचा वापर आणि व्यवस्थापन करणे हे नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. थेंबे थेंबे तळेच का समुद्र साचे,। तसा समुद्र वाचे सुद्धा ! या म्हणीनुसार आपल्या जबाबदारीचा थेंबभर हातभार मोलाचा आहे.
विद्या हर्डीकर सप्रे , कॅलिफोर्निया ( नोव्हेम्बर २०१८)








