जुने टाकुनी नवीन घ्या ….




फ्लोरिडा मधील एका ‘खाद्य वस्तू भाजी भांडार’ म्हणजे ग्रोसरी स्टोअरमध्ये  सामान भरून पैसे देण्याच्या रांगेत मी उभी होते. माझ्या आधीच्या बाईचे सामान प्लास्टिक पिशव्यात भरून दिले जात होते. .  25 एक पिशव्या भरल्या असतील . त्या पिशव्या पाहून माझा पर्यावरण प्रेमी जीव थोडा थोडा होत होता. माझा नंबर लागला तेव्हा मी पटकन माझ्याकडच्या दोन तीन  कापडी पिशव्या पुढे केल्या!
त्या बाईने मागे वळून पाहिले आणि माझ्याकडे विचित्र कटाक्ष टाकला !  तेव्हा मीच तिला हसत म्हणाले, “ मी कॅलिफोर्नियाची आहे. आमच्या राज्यात प्लास्टिक पिशव्यांचा कायदा आहे. त्यामुळे मला घरून कापडी पिशव्या आणायची सवय आहे. “
मी उत्तर दिले तेव्हा  मला आठवण झाली ती तीस चाळीस वर्षांपूर्वीची ! भारतातून नुकत्याच आणि प्रथमच आलेल्या माझ्या शेजारणीला बरोबर घेऊन मी भाजी आणायला  जाणार होते. ती आपली आली हातात पिशवी घेऊन ! तेव्हा मी तिच्याकडे अस्साच विचित्र कटाक्ष टाकला होता. म्हणजे सवयीची थेट पृथ्वी प्रदक्षिणाच झाली की !

गंमत म्हणजे  मीसुद्धा पुण्यात असताना , लहानपणी भाजीला जाताना हातात कापडी पिशवीच  घेऊन जात असे ! लहानपणी कापडाच्या पिशव्या, काग दात मिळणारी भेळ, झाडाच्या पानात बांधलेले फुलांचे पुडे   हे सर्रास दिसत असे. वहीचे न वापरलेले कागद फाडून त्यांच्या नव्या वह्या शिवत असत. कोकणात तर निसर्ग अभिमुखता पदोपदी असे.   घरातला ओला कचरा साठवून आणि सांडपाणी वापरून त्यावर भाजीचा मळा फुलत असे.घरापुढे मांडव असे तो झाडांची पाने वापरून बांधलेला. .  केळीची पाने नाहीतर पत्रावळी वर जेवण असे. मग ती पाने गाई म्हशींच्या तोंडात जात. वाया म्हणून काही जात नसे. गुरांच्या शेणाने जमिनी सारवल्या जात. आजी जुन्या लुगड्याच्या गोधड्या शिवत असे.तिथले सर्वच रहाणीमान निसर्गचक्राशी बांधलेले.    

    या सवयी घेऊन अमेरिकेत आल्यावर  ‘इथे सगळीच नवलाई । दुकानात हात हलवत जाई।’ कारण टाचणीपासून हत्तीपर्यंत सर्वच गोष्टी कागदी खोक्यात नाहीतर प्लास्टिक आवरणात बांधून मिळत. नेण्यासाठी लहान मोठ्या  प्लास्टिक पिशव्या ! घ्या आणि टाका असा खाक्या !

 दुधासाठी कागदी खोके नाहीतर प्लास्टिकच्या च्या बरण्या असत. तेव्हा  ‘जीव थोडा थोडा होई’, टाकायला. “ हो बाई ! एवढी छान बरणी फेकून कशाला द्यायची” असं म्हणत ती साठवली जात असे.  सुरवातीला काही दिवस त्या बरण्या अर्ध्या कापून त्यांचा कुंडी सारखा उपयोग करून त्यात झाडे लावण्याचे प्रयोग होत असत.  पण दर आठवड्याला वाणसामानातून येणार्‍या या डबे बरण्याचा साठा इतका होई; की एक दिवस ‘त्या’ जिवाचा धडा करून ते सगळं कचऱ्यात  टाकावं लागे. हळूहळू ‘तो’ जीव निर्ढावला आणि प्लास्टिक वापरून ते धडाधड कचरा टाकण्याची सवय लागून गेली ! थरमोकॉल आणि प्लास्टिक यांच्या बशा पेले वापरून पार्ट्या करण्याची चटक लागली.  या देशाच्या कचऱ्यात जाणाऱ्या कागदात आणखी एक देश जगेल असे म्हणणारा ‘तो’ जीव बिनधास्तपणे कागदाची रिमे च्या रिमे कचऱ्यात जमा करू लागला. एवढेच नव्हे तर “आपण एकेकाळी प्लास्टिक, नायलॉन अशा उपयुक्त गोष्टींशिवाय जगत तरी कसे होतो” अशा विचारांचं अवलंबित्वही आलं, . माणसांना म्हणजे अख्या देशालाच !     
मग हळूहळू ‘कागद वाचवा झाडे जगवा’  असे पर्यारवण प्रेमी विचार अमेरिकेत आणि तथाकथित सुधारलेल्या देशात  होऊ लागले. काही लोक कागदी कचरा टाकण्यासाठी वेगळे डबे करा असा आग्रह धरू लागले शाळेतले विद्यार्थी घरोघरची रद्दी गोळा करून ती पुनर्वापर म्हणजे रिसायकल केंद्रात विकून शाळेच्या उपक्रमांसाठी पैसे जमवताना दिसू लागले.  पर्यावरणाचा करताना कचरा नियोजन ,व्यवस्थापन, पुनर्वापर, निर्मूलन, आणि धोकादायक व टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे मार्ग या सर्वांवर एकत्रित विचार करण्याची गरज वाटू लागली. इलेक्ट्रॉनिक कचरा, न वापरलेली औषधे, रुग्णालयातील कचरा, वापरून उरलेली रसायने यांच्या योग्य विल्हेवाटीचे प्रयत्न सुरू झाले.

प्लास्टिक बंदी आणि पुनर्वापर ( रिसायकलिंग ) यासाठी  साठी पद्धतशीर प्रयत्न करणारे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतील  पहिले राज्य.
शाळाशाळांतून पाण्याच्या बाटल्या भरून घेण्यासाठी यंत्रणा ठेवली जाऊ लागली. त्यातून प्लास्टिक बाटल्यांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.
गावागावातील नगरपालिकांनी कागद, कोरडा कचरा,हिरवा कचरा,   पुनर्वापर कचरा ,ओला (आणि बायोडिग्रे डेबल) कचरा असे वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना कचऱ्याचे डबे दिले. पुनर्वापराच्या दुधाच्या प्लास्टिक बरण्या किंवा खाद्यपदार्थांचे डबे कचऱ्या त टाकण्यापूर्वी धुवून , स्वच्छ करून घ्यावे  लागतात. सुरवातीला सुखवस्तू आळशी मनांना त्याचा कंटाळा येई. पण मग पर्यावरण प्रेम, कर्तव्यबुद्धी इ. भावनांचे मोर्चे आळसावर धाडी घालू लागले. दूरदर्शन, मासिकातील लेख आणि माहितीचा मारा यामुळे टप्प्याटप्प्यानी ‘बिघडलेलें लोक ‘घडू’ लागले.

सगळेच प्लास्टिक पुनर्वापरायोग्य नसते. डब्यांच्या मागे त्यासंबंधी खुणा असतात. याचेही प्रशिक्षण यथावकाश झाले .  
कॉफीचे कागदी कप कागदी कचऱ्याबरोबर जातात अशी समजूत चुकीची असू शकते. कारण या कपावर   पातळ प्लास्टिक चे आवरण असते, हे लोकशिक्षण होण्यासही वेळ लागला.
प्लास्टिक पिशव्या पुनर्वापरायोग्य कचर्यात टाकल्या तर त्यामुळे कचरा सुव्यवस्थापन यंत्रात अडकून  ती यंत्रणाच तुंबते व प्रश्न येतात. तेव्हा त्या पिशव्या त्यासाठी मुद्दाम ठेवलेल्या डब्यातच टाकाव्यात ही  माहिती नीट समजण्यास काहीसा वेळच लागला.

1991 मध्ये प्लास्टिक पॅकेजिंग कंटेनर संबंधी चा  कायदा या राज्यात झाला. .काही पर्यावरणप्रेमी भा जी भांडारे कागदाच्या पिशव्या देऊ लागली.   एवढेच नव्हे तर “तुमच्या कापडी पिशव्या आणा” असे प्रोत्साहन देवून त्या दुकानांनी कागद वापर कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले.  नंतर काही ग्रोसरी दुकानांनी ग्राहकांना सांगितले की, “ तुम्ही तुमची स्वतःची पिशवी आणल्यास आम्ही तुम्हाला प्रोत्साहन म्हणून प्रत्येक पिशवीमागे काही पैसे   परत देऊ.”

 2016 मध्ये कॅलिफोर्नियात  असा कायदा झाला की दुकानदारांनी ग्राहकांना पुनर्वापर करता येण्यासारख्या पिशव्या  विकत द्याव्यात किंवा ग्राहकाला सामान भरण्यासाठी प्लास्टिक पिशवी दिली तर दिलेल्या  प्रत्येक प्लास्टिक पिशवी मागे किमान 10 सेंट लावावेत. म्हणजे थोडक्यात; तुमची पिशवी तुम्ही न्यायला विसरलात तर दुकानदार  तुमची गैरसोय करत नाहीत. पण तुम्हाला त्याबद्दल भुर्दंड पडतो ! त्यामुळे हळू हळू ग्राहकांना आपापल्या पिशव्या भाजीला नेण्याची सवय लागली.  प्लस्टिक वापर कमी झाला. अर्थात दुकानात सुट्या पालेभाज्या , फळे इत्यादी भरण्यासाठी त्या-त्या विभागात प्लास्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या असतात.  इतर वस्तूंच्या दुकानात वस्तूंवर प्लास्टिकची आवरणे वापरलेली असतात. तेव्हा हा प्रश्न अजून पूर्ण सुटला नाही.

असाच प्रश्न उपहार गृहात येत असतो लोक जेवल्यानंतर उरलेले पदार्थ  घरी घेऊन जाऊ शकतात. आता हे अन्न देण्यासाठी प्लास्टिक अथवा स्टायरो फोम चे डबे वापरले जातात यावर उपाय काय  ? ‘गि र्‍हाइकांचा संतोष हाच आमचा फायदा’ असे ब्रीद असल्यामुळे “आता तुम्ही आपापले डबे घेऊन या” असे सांगणे शक्य नाही. . तसेच “ सगळं. संपवयाच हं ! घरी काही न्यायचां  नाही. आम्ही उरल्या सुरल्याला डबे देत नसतो. ” अशी प्रेमळ पाटी लावणे इथे जमणार नाही. काही शहरात स्टायरोफोमचे डबे बाद केले आहेत. तिथे प्लास्टिक डबे हा उपाय उरतो. म्हणजे प्लास्टिक कचरा  वाढतो ! (काही ठिकाणी कागदी डबे देण्याचा प्रयत्न होतो. )
नॉर्थ कॅरोलीनातील   क्रिस्टल ड्रेसबँक नावाच्या पर्यावरण प्रेमी महिलेला  या प्लास्टिक आणि स्टायरोफॉम कचऱ्याचा उबग आला. सॅन फ्रान्सिस्को शहरात स्टायरोफोमचे डबे बाद केल्याची बातमी  क्रिस्टल ने वाचली. तेव्हा आपल्या गावातील स्थानिक कारभाऱ्यांना तिने असे प्रयत्न करण्याची विनंती केली. पण ब्युरोक्रसीमध्ये  तिचे कागदी घोडे अडकून पडले.
तेव्हा तिने स्वतः एमी टेलर नावाच्या दुसऱ्या महिलेबरोबर भागीदारीत ‘ग्रीन टु गो’ नावाची संस्था स्थापन केली या संस्थेने उपहारगृहं बरोबर सहकार्याने काम सुरू केले.  त्याची थोडक्यात कल्पना अशी की या उपहारगृहानी पुनर्वापर करण्यासारख्या प्लास्टिक डब्यात पदार्थ भरून द्यायचे. ग्राहकांनी आपले काम झाल्यावर रिकामे झालेले डबे ‘ग्रीन टू  गो’ या संस्थेच्या ’ ग्रीन टू गो’ नावाच्या कचरा डब्यात टाकायचे मग या संस्थेचे स्वयंसेवक डबे घेऊन जातात. ते डबे स्वच्छ धुवून निर्जंतुक करणारी यंत्रणा गावात असते. तेथे व्य वस्थित निर्जंतुक करून डबे पुन्हा उपहारगृहात परत पाठवले जातात.  हा प्रयोग यशस्वी झाला तर आणखी गावात तो करण्याची योजना आहे संस्थेचे संकेतस्थळ http://www.greentogo.com आहे. ड्यूक विद्यापीठाने या प्रयोगावर संशोधन करून सिद्ध केले की असा एक डबा एक हजार टाकाऊ डब्यांचा कचरा वाचवू शकतो.

पाणी पिण्यासाठी जगात सगळीकडेच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक बाटल्याबद्दलची आकडेवारी पाहिली की त्या प्रश्नाने आ वासला जातो ! एका प्लास्टिक बाटलीचे पूर्ण विघटन होण्यास सुमारे ४०० वर्षे लागतात या पृथ्वीतलावर दिवसाला एक मिलियन बाटल्या कचऱ्यात जातात !          
तसाच प्रश्न पेयपानासाठी वापरल्या जाणाऱ्या नळ्यांचा आहे. नुसत्या अमेरिकेत दर दिवशी ५०० मिलियन नळ्या वापरून फेकल्या जातात. या प्रश्नाला वाचा फोडली एका “ sea turtle with a straw “ या यु ट्यूब व्हीडीओ ने !
जरी या नळ्या पुरावापर करता येणाऱ्या पॉलीप्रोपालिन पासून बनवलेल्या असल्या तरी त्या पुनर्वापर डब्यापर्यंत पोहोचतच नाहीत. त्या सरळ कचऱ्या त जातात. किंवा त्या इतक्या हलक्या असतात  त्यांचे योग्य वर्गीकरण होण्याची यंत्रणा नसते. इ .स. १८०० मध्ये कागदी पेय नळ्या सुरु झाल्या. १९६०मध्ये प्लास्टिक पेयनळ्या तयार होऊ लागल्या.
तेव्हापासून हा प्रश्न आहे. आता अमेरिकेतील काही शहरात या नळ्या वर बंदी येत आहे. काही ठिकाणी या नळ्या मागितल्या तरच दिल्या जातात. तर काही ठिकाणी कागदी नळ्या वापरल्या जातात. स्टारबक्स सारख्या काही कंपन्या पेयनळ्या देणे बंद करणार आहेत. त्यांच्या कपांची जमीनदोस्त होणारी म्हणजे बायोडिग्रेडेबल झाकणे वापरल्याने नळ्या वापरण्याची गरज पडणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. (ज्यांना नळीनेच पेय घावे लागते अशा विकलांग लोकांचे काय असा नवा प्रश्न यातून निर्माण होऊ शकेल.. पण  )
         
अमेरिकन माणूस दर दिवसाला   सुमारे सरासरी साडेचार पाउंड प्लास्टिक कचरा टाकतो असे म्हणतात. अमेरिकेतील काही राज्यांनी हालचाल व कायदेकानू केले तरी अजून काही  राज्यांनी प्लास्टिक वापरासाठी कायदे केले नाहीत याचा अर्थ अजून बराच प्लास्टिक कचरा समुद्रात जातो ! जगात बाकीचे देशही मागे नाहीत !
प्लास्टिक आणि इतर टिकावू पॉलिमर च्या कचऱ्याचा प्रश्न वस्तूंइतकाच टिकावू आणि  आणि चिवट आहे !
श्रीमंत देशांच्या श्रीमंतीचे  प्लास्टिक पाश जगासाठी शाप ठरले आहेत.

अमेरिकेतच नव्हे तर जगात हा प्रश्न आहे. १९६९मध्ये चंद्रावर पॉलिमर धाग्याचा  झेंडा रोवून आपण हा प्रश्न चंद्रावरही नेला आहे. १९५०पासून आपण सुमारे ८ बिलियन टन एवढे पॉलिमर निर्माण करून पृथवी भोवती त्याचे चार विळखे होतील एवढा फास निर्माण केला आहे. यातील फक्त ९% प्लास्टिक पुन्हा वापरले गेले. ६० टक्के कचऱ्यात टाकले गेले. उरलेले अर्थातच समुद्रात गेले. या समुद्रात गेलेल्या पॉलिमरचे काय होते याचे एक  प्रदर्शन मी अलास्कामध्ये पाहिले. सूर्य आणि समुद्रातील मीठ यामुळे या पॉलिथिनचे सूक्ष्म तुकडे होतात. त्यांच्याभोवती अन्य गोष्टी साचून त्यांची विषे तयार होतात. ते सर्व समुद्रातील जीवांच्या पोटात जाते. यातले काही समुद्रजीव “सी फूड” म्हणून माणसाच्या पोटात जातात. तज्ञाचे म्हणणे असे आहे की २०५० पर्यंत समुद्रातील प्लास्टिकचे प्रमाण माशांपेक्षा जास्त असेल !    जर दर वर्षी ८ मिलियन टन एवढे प्लास्टिक समुद्रात जात असेल तर हे भाकीत अपरिहार्य आहे !
‘पर्यवरण- पृथ्वी वाचवणे’  हा मोठा व्यापक विषय आहे, आणि प्लास्टिक व तत्सम पदार्थ हा त्याचा एक भाग आहे.    त्यामुळे या जागतिक समस्येवर सर्व जगात विचार केला जात आहे. या विषारी प्रक्रियेचा जीव सृष्टीवर काय परिणाम होईल याची चिंता दहा युरोपियन लोकातील नऊ लोक   करतात.ब्रिटनमधील अगदी भिन्न विचारांची दैनिकेसुद्धा या प्रश्नासा ठी हातमिळवणी करून लोकशिक्षण आणि प्रचार करत आहेत.

यावर एक चांगला उपाय काय तर प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे आणि ते कचऱ्यात न टाकता गोळा करून त्याची योग्य व्यवस्था करणे.  कचराव्यवस्थापन हा प्रश्न प्लास्टिक इतकाच गंभीर होत जाणार आहे
त्यामुळे दोन्हीचा विचार एकत्रितपणे करावा लागतो.

श्रीमंत देशात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चांगली यंत्रणा असते. तिथे हे काम मुळातच सोपे असते. जनमानसाची जागृती करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी नाहीतर दंड या उपायांचा उपयोग चांगला होतो.

२०१८च्या जानेवारीपासून चीनने काही प्रकार च्या पुनर्वापरा योग्य प्लास्टिक  कचऱ्याची आयात बंद केली. तसेच कचऱ्यातील अस्वच्छ प्लास्टिक साठी दंड लावणे सुरु केले. असा  अस्वच्छ प्लास्टिक गोष्टी असलेला कंटेनर जर चीनने नाकारला तर तो अमेरिकेत परत पाठवणे इ . साठी  सुमारे शंभर हजार डॉलर्सचा खर्च येतो. याचा अर्थ आपल्या कचऱ्याचा काही प्रश्न चीनवर ढकलणे आता अमेरिकेला व अन्य देशाना शक्य नाही. त्यामुळे त्यांच्या यंत्रणेचे बळ वाढवावे लागेल. कदाचित त्यांना प्लास्टिक वेगळे करून त्याचे व्यवस्थापन कर णे   आर्थिक दृष्ट्या सुखाचे होणार नाही.. मग ते प्लास्टिक जर अन्य कचऱ्याबरोबर गेले, तर काळाच्या ओघात सुमद्रात जाण्याची शक्यता वाढेल.

अर्थात चं  अमेरिका व युरोप या देशातील प्रयत्न   प्लास्टिकचा जागतिक प्रश्न सोडवू शकणार नाहीत. कारण  प्लास्टिक प्रदूषण करणाऱ्या पहिल्या आठ देशातील सर्व देश आशियात आहेत ! समुद्रात जाणाऱ्या एकूण प्लॅस्टिकच्या दोन तृतीयांश प्लास्टिक या आठ देशातून जाते ! चीन अर्थातच या आठ देशातील एक देश आहे. पण त्यांना कचरा आणि प्लास्टिक निर्मूलनाची सुसज्ज यंत्रणा निर्माण करणे परवडणारे आहे.
व्हिएतनाम, थायलंड या देशात धड कचरा निर्मूलन व्यवस्था नाही आणि तिथे भारतासारखी भंगार , चिंध्या गोळा करण्याची मोठी उलाढाल होत नाही ( या उलाढालीमुळे भारताचा नंबर या आठ देशात अजून  नाही; पण केव्हाही लागेल !) . तेव्हा प्रगत देशानी आपले पैसे आणि तंत्रज्ञान पणाला लावून आशियाई देशाना मदत करणे महत्वाचे होत आहे. कचरा व्यवस्थापना यंत्रणा, कायदे करण्यासाठी प्रयत्न , आणि मुख्य म्हणजे लोकशिक्षण व लोकजागृती हा सर्वच आघाड्यांवर युद्धपातळीवरचे प्रयत्न करण्याची वेळ आलेली आहे.
    केनिया , बंगला देश यासारख्या मागास देशात प्लास्टिक बंदीचा उपयोग जास्त परिणामकारक होतो असे निरीक्षण आहे.  
आपल्या लहानपणाच्या कोकणातले निसर्गचक्राशी सुसंगत साधे जीवन गेले . पण  नवे तंत्रज्ञान आणि सुखसोयी यांचा वापर करून पर्यावरण आणि निसर्गचक्राची पायमल्ली न करता जीवन सुखाने घालवण्याचे नवे मार्ग असू शकतात.
सौर ऊर्जेचा वापर, घरातील सांडपाण्याला   वेगळ्या पाईपद्वारे वाट काढून ते पाणी गावातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरवणे , ‘स्मार्ट घरे ‘बांधून  ऊर्जेची बचत असे नवे पर्याय आता कॅलिफोर्नियातल्या लहान लहान गावात सुरु झाले आहेत. ( कॅलिफोर्निया मध्ये पाण्याचाही प्रश्न आहे!)  . तसेच शाळांशाळांतून पर्यावरण विषयक जागृती साठी उपक्रम सुरु केले आहेत.

सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. पण पृथ्वीभोवतीचा प्लास्टिक फास दिवसेंदिवस आवळत चालला आहे आणि समुद्रालाही गिळंकृत करत आहे हे सत्य प्रत्येकाने समजावून घेणे आणि जागरूकतेने प्लास्टिकचा वापर आणि व्यवस्थापन करणे हे नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.  थेंबे थेंबे तळेच का समुद्र साचे,। तसा समुद्र वाचे सुद्धा ! या म्हणीनुसार आपल्या जबाबदारीचा थेंबभर हातभार मोलाचा आहे.
विद्या हर्डीकर सप्रे , कॅलिफोर्निया    ( नोव्हेम्बर २०१८)


राष्ट्रीय कृतज्ञता दिन

अमेरिकेत आल्यावर माझ्या लक्षात आलं की, प्रत्येक बारीकसारीक गोष्टीतही एकमेकांना ‘थॅँक्यू’ म्हणतात! हे ‘थॅँक्यू’ प्रशिक्षण मी आल्या आल्याच इतकं आत्मसात केलं की, एकदा ‘एलेव्हेटर’लाही  ‘थॅँक्यू’ म्हणून टाकलं!

यामुळे इथे ‘थँक्सगिव्हिंग’चा सण साजरा होतो हे समजल्यावर एवढं आश्चर्य नाही वाटलं. माझा पहिला ‘थँक्सगिव्हिंग’ साजरा झाला बेवर्ली आणि फ्रँक रुटॅन कुटुंबाच्या घरी! (मी विद्यार्थिनी असताना त्यांच्या घरी भाडय़ाची खोली घेऊन राहत होते.) या सणाची तिची तयारी तीन महिने चालू होती! तिच्याकडे छान रंगीत चित्रांची ‘गुर्मे कुकिंग’ची पुस्तकं होती! या सणाला काय करायचं हे बरंचसं ठरलेलंच असतं. तरीही बेवर्ली तिच्या खास खास पाककृत्यांचा विचार करत होती. मला तर ते आपल्या दिवाळीसारखंच वाटलं. म्हणजे लाडू, चकल्या वगैरे तर ठरलेलंच असतं- पण तरी ‘वहिनी तुम्ही रव्याच्या लाडूचं ते कसं करता?’ असं पूर्वी शेजारणी एकमेकींना विचारत तसं! (हल्ली ‘गूगल’ला किंवा चितळ्यांना विचारतात म्हणे!) घरात लग्न समारंभासारखी तयारी चालू होती! सामानाच्या याद्या- माणसांच्या याद्या- मग टेबलावर कोण कुठे बसणार त्याची टिपणं- कोणता पदार्थ कोणत्या भांडय़ातून वाढायचा- ओव्हनमध्ये काय- चुलीवर काय- पदार्थ उरला तर कशात काढायचा, भांडी कोण धुणार, इत्यादी.  बेवर्लीनं अगदी प्रत्येक क्षणाचं पद्धतशीर नियोजन केलं! जेवणघराची खोली रंगवून घेतली.

जसा सणाचा दिवस जवळ आला तशा वर्तमानपत्रांत ‘थँक्सगिव्हिंग’ सेलच्या जाहिराती आल्या. बेवर्लीने कूपन्सची कात्रणं कापून कोणत्या दुकानातून काय घ्यावं याचाही अभ्यास केला! चार दिवस आधी सामान आलं. दोन दिवस आधी जेवणघर सजवून सुंदर ठेवणीतल्या बशा वगैरे मांडून तयार झालं. कोंबडीसारख्या ‘टर्की’ पक्ष्यांची चित्रं असलेले टेबल नॅपकिन्स-टेबल मॅट्स आणि साजेशी गृहसजावट. मेणबत्त्या-पानगळीच्या पानांच्या रंगांच्या वेलबुट्टय़ा, ‘पाइनकोन्स’च्या वासाचा घमघमाट! – काही पदार्थ आदल्या दिवशी बनवले तर काही सणाच्या दिवशी सकाळी!

फ्रँकचं काम होतं तो मोठ्ठा ‘टर्की’ नामे पक्षी आणून त्याच्या पोटात भात आणि असलं काही ‘स्टफिंग’ भरून ओव्हनमध्ये ‘बेक’ करण्याचं! (तो ‘टर्की’ नावाचा पक्षी मूर्ख असतो असं म्हणतात!) मी आणि बेवर्ली बाकीचं सर्व! कोणी काय करायचं याच्या सूचना आणि सर्व कसं चोख! मी शाकाहारी म्हणून बेवर्लीनं मुद्दाम एकाऐवजी दोन भाज्या उकडल्या होत्या. शिवाय सॅलड आणि ‘पंपकिन पाय’ म्हणजे लाल भोपळ्यापासून बनवलेला गोड पदार्थ! तिचा पद्धतशीरपणा आणि कामाचा चटपटीतपणा  वाखाणण्याजोगा!

बरोबर वेळेला त्यांची मुलं आणि सुना-जावई उगवले! ठरलेल्या ठिकाणी बसले! ठरावि क वाइन डेव्हिडनं सर्वाना दिली आणि पुन:पुन्हा ‘धिस लुक्स ग्रेट- थँक्स फॉर मेकिंग धिस डिनर’ असं सर्वानी बेवर्लीला सांगितलं. मग ‘ग्रेस’ म्हणण्याचा कार्यक्रम! नुसतंच ‘देवाला’ थँक्यू म्हणायचं नाही तर कशाबद्दल ‘थँक्यू’ तेही सांगायचं! कोणी ‘वर्ष सुखाचं आणि आरोग्यदायी गेल्याबद्दल’ कोणी देवासोबत जोडीदार आणि मित्र यांनाही कशा कशाबद्दल ‘थँक्यू’ म्हटलं..
‘आमच्या कुटुंबात सहभागी झाल्याबद्दल थँक्यू’ असं मला बेवर्लीनं तर ‘Dear Rutan family; Thank you for including me as your subroutine’ असं म्हणून मीही रंग भरला मेजवानीत! सर्वात शेवटी सर्वानी ‘आमेन’ म्हणायचं आणि भोजन सुरू! प्रत्येक पदार्थ म्हणजे ‘कोर्स’ला वेगळ्या सजावटीची बशी- त्या उचलून, आत ठेवून दुसऱ्या आणण्याची-मांडण्याची वेबर्ली आणि एलीची गडबड! पण ते ठरल्याप्रमाणे! उगाच बाकीचं कोणी उठून गोंधळ करत नव्हतं! माझं काम तो ‘पंपकिन पाय’ नामे गोड पदार्थ बशांत भरून आणण्याचं होतं! त्यासाठी माझं आदल्या दिवशी प्रशिक्षण करण्यात आलं होतं!  कोणताही गोंधळ, गडबड न होता- बश्या, पेले-भांडी धुवून ती अडकवण्यापर्यंतची सर्व कामं ठरल्याप्रमाणे चोख! तीन तासांत समारंभ संपून मुलं आपापल्या गाडय़ांतून घरोघर गेलीसुद्धा! जाताना ‘Everything was so perfect. Dinner was delicious. Thank you for the dinner’ असं पुन:पुन्हा सांगायला विसरली नाहीत! मीही बेवर्लीला प्रेमाने ‘दमलीस बाई! छान झालं हो सर्व’ असं सांगितलं आणि तिनं मला ‘Thank you for your big help’ असं म्हटलं. बेवर्लीला प्रेमाने ‘दमलीस बाई! छान झालं हो सर्व’ असं सांगितलं आणि तिनं मला ‘Thank you for your big help’ असं म्हटलं.

अशा कौटुंबिक जेवणाच्या वेळी स्वत: सर्व बनवणाऱ्या बेवर्लीसारख्या अन्नपूर्णा फार थोडय़ा. बहुतेक साऱ्या ‘सोयपूर्णा!’ थँक्सगिव्हिंगचं जवळजवळ सर्व तयार मिळतं! फार तर एक दोन ‘कॅन्स’ उघडून उपडी करायचे नक्षीदार भांडय़ांत! पण वर्षांतून एकदा होणाऱ्या, पाच-सहा माणसांच्या त्या जेवणाचा मोठ्ठा बोभाटा! दोन महिने आधीच बायकांना टेन्शन! पाककृत्या टीव्हीवर, गूगलवर-वर्तमानपत्रांत येत असतात! थँक्सगिव्हिंगचं जेवण म्हणजे सॅलड, क्रॅनबेरी सॉस, उकडलेली ब्रॉकली, ‘बीन्स’ म्हणजे शेंगा उकडून केलेला पदार्थ, उकडलेल्या बटाटय़ांचा मॅश पोटॅटो, स्वीट याम्स (उकडलेली रताळी), टर्कीच्या पोटातलं स्टफिंग, ब्रेड, टर्की आणि ‘पंपकिन पाय’! ते जेवण बनवायला लागतात फार तर तीन तास! ‘टर्की’ मात्र ओव्हनमध्ये काही तास ‘रोस्ट’ किंवा भाजावा-शिजावा लागतो! प्रत्येक घराची संस्कृती आणि गृहिणीचं व्यक्तिमत्त्व ‘थँक्सगिव्हिंग डिनर’मध्ये डोकावतं! मी एका ‘ग्रीक’ अमेरिकन घरी पाहिलं तर तिथे एकदम भारतीयांसारखं ऐसपैस वातावरण! ‘बिग फॅट ग्रीक थँक्सगिव्हिंग!’ भरपूर माणसं, गोंधळ, दंगा! मज्जा! इत्यादी. काही विद्यापीठांत प्राध्यापक मंडळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मुद्दाम घरी जेवायला बोलावतात.

आता ‘व्हेजिटेरियन’ आणि ‘व्हेगन’ थँक्सगिव्हिंग डिनर्स असतात! सोयाबिनच्या ‘टोफू’चा टर्की त्यासाठी बनवतात. बेवर्लीकडे ‘आदर्श थँक्सगिव्हिंग’चे प्रशिक्षण घेतल्यामुळे आमच्या घरी दर वर्षी हा सण साजरा होतो. नातेवाईक आणि मित्रमंडळी मिळून २०-२५ माणसं येतात! क्रॅनबेरी सॉसला कढिलिंब-मेथीची फोडणी देऊन या सणाला आम्ही चविष्ट भारतीय साज चढवतो! थँक्सगिव्हिंगच्या जेवणात अमेरिकन माणूस सुमारे पाच हजार कॅलरीजचा म्हणजे दोन-अडीच जेवणांचा खुराक फस्त करतो. या सणाला गाडय़ा, रेलगाडय़ा आणि विमाने मिळून वर्षांतला जास्तीत जास्त संख्येने प्रवास होतो. या सणाला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक तशी सामाजिकही बाजू आहे!
हा सण आपल्या दिवाळीसारखाच धनधान्य समृद्धीचा! आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण! दिवाळीच्याच सुमारास येतो आणि दिवाळीच्या वसुबारसाला जशी दान करण्याची, आपल्यातील धनधान्य गरिबांना देण्याची आपली जुनी प्रथा तशी या थँक्सगिव्हिंग सणाला गरीब आणि बेघर लोकांना जेवण देण्याची प्रथा आहे. चर्चेस, सामाजिक संस्था त्याची योजना करतात. कंपन्या, दुकाने आपापल्या दारात पिंपे ठेवतात. त्यात लोक फूड कॅन्स घालतात. ठिकठिकाणी असे ‘food can drives’ होतात आणि लोक सढळ हातांनी मदत करतात.

या सणाच्या प्रथेचं मूळ इंग्लंडमधील प्रॉटेस्टंट पंथाच्या परंपरेत आहे. कॅनडा, अमेरिका आणि इतरही काही देशांत ‘थँक्सगिव्हिंग’ची प्रथा आहे. इंग्लंडमधून ही प्रथा घेऊन अमेरिकेत जे लोक आले, त्यातल्या मॅसॅच्युसेट राज्यातल्या फ्लिमथ या भागात १६२१ मध्ये पहिले ‘थँक्सगिव्हिंग डिनर’ झाले असे म्हणतात. १०० लोकांच्या वसाहतीतल्या सुमारे ५० लोकांचा दुष्काळ आणि अडचणींत मृत्यू झाला. वसाहतवाल्यांना शेतीसाठी स्थानिक रेड इंडियन लोकांनी मदत केली. तेव्हा पहिल्या चांगल्या पिकानंतर ५० युरोपियन आणि त्यांनी पाहुणे बोलावलेले ९० रेड इंडियन्स असे ते भोजन झाले! त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टनने १७८९ मध्ये एक जाहीरनामा काढून ही भोजनप्रथा देशभर सुरू करावी असे ठरवले! १८६३ मध्ये लिंकनसाहेबांनीही जाहीरनामा काढून हा ‘राष्ट्रीय दिन’ म्हणून पाळावा असे ठरवले.

‘थँक्सगिव्हिंग’ हा कोणत्याही भेटवस्तू एकमेकांना न देता निव्वळ कौटुंबिक सहभोजन करण्याचा सण- सरकार दरबारी त्याचा दिवस असतो नोव्हेंबरचा चौथा गुरुवार! म्हणजे तब्बल चार दिवसांची सुटी- तद्दन सणासुदीचे जेवण- शुक्रवारी ‘Black Friday’ म्हणजे खरेदी न करण्याचा दिवस (पण त्या दिवशी दुकानात नाताळच्या खरेदीची झुंबड उडते) आणि शनिवारपासून नाताळची तयारी- म्हणजे घरी-दारी-सरकारी उत्सवी वातावरणाची सुरुवात! १९२४ पासून या दीर्घ उत्सवाची ‘शोभा यात्रा’ म्हणजे ‘Macy’s Thanksgiving Parade’ काढण्याची आणखी एक परंपरा! न्यूयॉर्क, डेट्रॉइट अशा ठिकठिकाणी या शोभायात्रा निघतात- शेवटचा ‘रथ’ सांताक्लॉजचा! वर्षभर मनापासून काम करा.. आपल्याला काम देणाऱ्या हातांबद्दल, काम करायला शक्ती आणि आरोग्य देणाऱ्या परमेश्वर किंवा तत्सम शक्तीबद्दल आणि आनंद देणाऱ्या सहोदरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी.
ज्यांनी पिडलं, त्या ‘टर्की’ वृत्तीच्या मूर्ख लोकांना क्षमा करावी- ज्यांची चूल अडली त्या दुर्दैवी लोकांना आपल्यातला वाटा द्यावा..
आणि मग भरभरून आनंदाचा, भेटवस्तूंचा वर्षांव करत येणाऱ्या सांताक्लॉजच्या स्वागतासाठी गुढय़ातोरणं उभारावीत- त्यासाठी असतो हा राष्ट्रीय कृतज्ञता दिन! ‘व्हॅलेंटाइन्स डे’ आणि ‘नाताळ’सारखा हा ‘कृतज्ञता दिन’ही जगभर- विशेषत: भारतात साजरा व्हावा!  

विद्या हर्डीकर सप्रे

(पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता , एप्रिल २०१५ )

‘नामी’ पदयात्रा

प्रथम वेगवेगळे असलेले गट नंतर वेगवेगळ्या वेगामुळे परस्परांत मिसळून गेले. ……..

एक प्रसन्न सकाळ.. कॅलिफोर्नियातली! निळं, मोकळं आकाश आपलं प्रतिबिंब एका निसर्गरम्य सरोवरात पाहणारं. सरोवराकाठच्या मोकळ्या जागेत उभारलेली निळ्या-पिवळ्या फुग्यांची कमान आणि भोवती पन्नासएक कापडी कनापींनी शोभणारी टेबलं. सकाळचे आठ वाजलेले. आणि म्हणून येणाऱ्या लोकांचं स्वागत करणारं न्याहारीचं टेबल. न्याहारीचे मफिन्स एका बेकरीनं देणगी दिलेले; तर कॉफी ‘स्टारबक्स’ने देणगी म्हणून पाठवलेली. बाजूच्या टेबलांवर माहितीपत्रकं घेऊन बसलेले, रंगीबेरंगी टी-शर्ट्स घातलेले हसतमुख स्वयंसेवक! आवारात लगबग करणारे, ‘सेल्फो’(न) ‘सेल्फी’ घेणारे हसते-खिदळते टी-शर्ट्सचे गट! जांभळ्या टी-शर्टवर बोधवाक्य आहे : ‘मेक अ डिफरन्स!’ पिवळ्यावर लिहिलं आहे : ‘एव्हरी जर्नी बिगिन्स विथ दॅट फर्स्ट स्टेप!’ हिरवा टी-शर्टचा जथ्था म्हणतो : ‘कीप काल्म.. लव्ह युवरसेल्फ!’ इथे ‘म्हणत’ कोणीच नाही, आरोळ्या कोणीच देत नाही; पण प्रत्येक टी-शर्टवरचा मजकूर न बोलता बोलतो आहे.. न सांगता मनावर ठसतो आहे. ‘चेंजिंग माइंड- वन स्टेप अ‍ॅट अ टाइम’, ‘स्टिग्मा स्टॉम्पर!’, ‘वॉक फॉर होप!’, ‘रॅप!’ (Wellness Recovery Action Plan), ‘प्रोव्हायडिंग हेल्प.. एम्पॉवरिंग रिकव्हरी’ ही बोधवाक्ये म्हणजे माझ्या ‘नामी’ पदयात्रेची मनाची तयारी! मजबूत बूट आणि ट्रॅकसूट घालून पाच मैल पदयात्रेची तयारी करून माझ्यासारखेच आणखीन दोन हजार लोक आजूबाजूच्या सात गावांतून आलेले आहेत. कोणत्याही घोषणा न देता लोक टीशर्ट आणि पाट्या यांच्या माध्यमातून अतिशय बोलके आणि मार्मिक संदेश देत होते.. उदा: एका युवतीच्या हातात पाटी होती: “ My diagnosis is not ME”.

आमच्या भागातलं ‘नामी’ पदयात्रेचं (NAMI WALK) हे दहावं र्वष आहे. अमेरिकेत गावोगावी ‘नामी’चे हे निधी-संकलन उत्सव होतात. प्रत्येक यात्रीनं आपापल्या मित्रमंडळींना ‘नामी’बद्दल सांगायचं.. जमल्यास पदयात्रेत सामील करून घ्यायचं.. देणग्या मिळवायच्या.. आणि सांगता या नामी पदयात्रेतून करायची! निसर्गाचा आनंद, नव्या लोकांच्या ओळखी आणि मेंदू ताजातवाना करणारा पाच मैलांचा हा व्यायाम! (मेंदू तरतरीत राखण्यासाठी शब्दकोडय़ांच्या बैठय़ा कामापेक्षा शारीरिक – पाच मैलांचा हा व्यायाम! (मेंदू तरतरीत राखण्यासाठी शब्दकोडय़ांच्या बैठय़ा कामापेक्षा शारीरिक व्यायाम जास्त उपयुक्त!) १९७९ मध्ये एका घरात चार कुटुंबांनी एकत्रितपणे सुरू केलेली ‘नॅशनल अलायन्स फॉर मेंटल इलनेस’ (नामी) ही सेवासंस्था आता सबंध अमेरिकाभर फोफावली आहे. आणि आज अमेरिकेतली मानसिक आरोग्यविषयक मूलभूत काम करणारी सर्वात मोठी संस्था आहे. ‘एज्युकेट, अ‍ॅड्वोकेट, लिसन, लीड’ ही ‘नामी’ची चार सूत्रं!
‘मेंदू हा हृदय व यकृतासारखाच शरीराचा एक अवयव. आणि कोणत्याही अवयवाला होतो तसा म्हणजे मधुमेह, रक्तदाबासारखाच विकार मेंदूलाही होऊ शकतो. तो विकार लाजिरवाणा नाही. त्यात रुग्णाचा दोष नसतो. म्हणूनच मनोरुग्णाला औषधोपचार करण्याची आणि माणूस म्हणून सन्मानानं जगायला मदत करण्याची आवश्यकता आहे..’ हे मानसिक आरोग्याबद्दलचे शिक्षण समाजाला देण्याचा वसा ‘नामी’ने उचलला आहे. ताप आल्यावर औषधोपचार मिळाला नाही तर शरीर तगमगतं- आराम मिळण्यासाठी स्वत:च गोळ्या खा- पाणी पी, इ. स्वयंउपचार माणसं करतात. तसंच मेंदूचं आहे. मेंदूचा काही आजार झाला तर मेंदू तडफडतो, तर्कशुद्धतेच्या जाणिवा कधी थकतात. औषधासाठी.. ‘बरं’ होण्यासाठी त्याचा आक्रोश सुरू होतो. त्यातून स्वयंउपचार होतात- म्हणजे व्यसनाधीनता येते, विवेकाची बंधनं सुटतात. त्यातून कधी गुन्हेगारी, कधी अत्याचारी मनोवृत्ती, तर कधी आत्मघात! माणसाला कीड लागते. पण ती तिथेच थांबत नाही. त्याच्या भोवतालच्या कुटुंबात- आणि पर्यायानं समाजात पसरते. त्यासाठी मनोरुग्णाचं, त्याच्या कुटुंबीयांचं, समाजाचं आणि सरकारचं- अशा विविध पातळ्यांवर प्रशिक्षण करणं, हे ‘नामी’चं एक काम!
माहिती, प्रचार, सरकारशी बोलून पटवणे अशी ‘अ‍ॅडव्होकसी’ करून आज नामीने राष्ट्रीय पातळीवर मानसिक आरोग्यासाठी विधेयके आणली आहेत. मानसिक आजारांवर, मेंदूवर संशोधन, आजारांचे निदान, परिणामकारक उपचार आणि दीर्घकालीन रोगमुक्ती यासाठी ‘आधुनिक मानसिक आरोग्य योजना’ हा या विधेयकांचा सारांश! – नामीने फोन हेल्पलाइन्स सुरू करून मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा आवाज ऐकण्यासाठी आणि मदतीसाठी वेगवेगळे प्रकल्प सुरू केले आहेत. आधारगट, ‘पिअर टू पिअर’, ‘फॅमिली हेल्पिंग फॅमिली’ असे शिक्षणवर्ग असे बरेच काही. विशेष म्हणजे हे काम करणारे स्वयंसेवक मनोरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांतलेच असतात. आत्महत्या प्रतिबंध केंद्रे, व्यसनमुक्ती कार्यक्रम, लहान मुलांवर मनोरुग्ण पालकांकडून होणारे अत्याचार थांबविण्यासाठी यंत्रणा, शहरे, परगणे (कौंटी), राज्य आणि मध्यवर्ती शासकीय पातळीवरून होणारे फंडिंग, कार्यक्रम, पोलीस यंत्रणा, विद्यापीठांच्या आरोग्य, वैद्यकीय, मानसशास्त्र, समाजशास्त्र, इ. विभागांचे कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या स्वयंसेवी संस्था, रुग्णालये.. असे मोठे संस्थांचे आणि कामाचे जाळे आहे. त्यांची माहिती देणारे पन्नासएक तरी बूथ मी पाहत होते. इथे आलेले दोन हजार लोक नामी पदयात्रेला काही ना काही कारणाने जोडले गेले होते. ‘तुम्ही यात कसे सामील झालात?’ हा माझा पत्रकारी प्रश्न मी टाळत होते. तरी एका ऐंशी वर्षांच्या आजीबाईंना मी तो विचारलाच! ‘‘अगं, मी आठव्या वर्षांपासून नैराश्याच्या आजाराने आजारी आहे. मला झटके येतात. पण माझा हा ब्याऐंशी वर्षांचा नवरा मला सांभाळून घेतो. संतच आहे बिचारा! मला आहे सांधेदुखी. मी नाही चालणार. पण तो चालणार आहे. नामीच्या आधारगटाचा मला फायदा झाला. मग समाजाला आपण परतफेड करायलाच हवी ना?’’ आजीबाई हसतमुखाने उत्तरल्या.
मी आता वेगळ्या नजरेने सभोवार पाहिले. प्रत्येक प्रवासाचा प्रारंभ होतो पहिल्या पावलाने. चालणाऱ्या लोकांची पावले मानसिक आजाराबद्दलची ‘कलंकित’ भावना पुसून टाकण्याच्या दिशेने पडत होती. या आजाराच्या संदर्भातील कोणतीही मदत म्हणजे आजारमुक्तीची शक्ती मिळवणे आहे, त्या आशेच्या पावलामागे प्रत्येकाचे पाऊल पडत होते. कोणी दमदार पायांनी तर कोणी काठीच्या आधारे.. कोणी तरुण तर कोणी म्हातारे.. स्त्री , पुरुष, मुले, काळे, गोरे गरीब, श्रीमंत सगळे एकत्र झाले होते..   इथे पांढरे, काळे, मेक्सिकन.. सर्व वर्णाचे, सर्व वयाचे, राजे असोत की रंक- कोणावर कोणत्या आजाराचा कधी हल्ला होईल ते सांगता येत नाही. एक सुदानहून आलेली विद्यार्थिनी आणि एक इराकहून आलेली ‘सार्वजनिक आरोग्य’ (Public Health) विषयाची संशोधिका भेटली. हे आजार, समाजाने रुग्णांना वाळीत टाकणे, अंधश्रद्धांचा पगडा, मनोरुग्णालयांची दुर्दशा इत्यादी प्रश्न कसे जागतिक स्वरूपाचे आहेत, हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येत होते. पोलिसांचे दोन बूथही शेजारी शेजारी होते. गुन्हेगारी, व्यसने आणि मनोविकार हे हातात हात घालून चालत असतात. त्यामुळे पोलिसांचा बूथ तसा अपेक्षितच. दुसऱ्या बूथवाल्या पोलिसाला मी विचारले, ‘तू काय करतोस इथे?’ (पोलिसाला न घाबरता प्रश्न विचारण्याची संधी म्हणून मी खूश!) ‘अगं, तो शेजारचा शेरीफ जास्त चांगला दिसतो; पण मी जास्त चांगलं काम करतो!’ तो हसत हसत म्हणाला. (व्वा! अमेरिकेतल्या पोलिसांनाही विनोदबुद्धी असते तर!) मग हसता हसता तो पुढे म्हणाला, ‘‘आमचं काम कायदा आणि सुव्यवस्था राखणे. पण म्हणूनच केवळ नामीशी संबंध नाही आमचा; तर आम्हीही माणसं आहोत. म्हणूनच मनोविकाराच्या विळख्यातून आमचीही सुटका नाही. कामाचे ताण आणि स्वरूप म्हणून म्हणा- आत्महत्या करण्याची टक्केवारी पोलीस खात्यात जास्त आहे. तेव्हा ‘नामी’ हा आमचाही आधार आहे! नुसतीच लोकांना मदत नव्हे, तर समाजात सुरक्षा, शांतता राखण्यासाठी मदत करणाऱ्या या आधारसंस्थांचे जाळे एक नागरिक म्हणून नामीशी माझे धागे जुळवायला पुरेसे कारण होते!’’ या नामी पदयात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून आलेली गावची महापौर, कौंटीच्या आरोग्य खात्याचा प्रमुख अशा बऱ्याच उत्सवमूर्ती या पदयात्रेपूर्वी रंगमंचावर होत्या. पण कुठे हारतुरे नाहीत की पत्रकारांच्या कॅमेरांचा क्लिकक्लिकाट नाही, की उत्सवमूर्तीच्या बरोबर घोटाळणारा गोतावळाही नाही! सुटसुटीत कार्यक्रम. सर्वानी उजवा हात हृदयावर ठेवून अमेरिकन नागरिकांच्या- सर्वाना समान स्वातंत्र्य आणि न्याय यासाठी कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रध्वजाला दिलेली वंदना.. लोकांना हसवणाऱ्या उत्साहमूर्ती सूत्रधाराने गप्पा मारता मारता सहज सांगितलेली मनोरुग्ण, उपचार, खर्च आणि आजारांची टक्केवारी (हा स्वत: एकेकाळी मनोरुग्ण होता.) आणि महापौरांचे मोजून दहा वाक्यांचे मार्मिक भाषण! ‘आपण ऑस्ट्रिचसारखे वाळूत तोंड खुपसून आणि ‘आमच्या घराण्यात नाही बाई ‘असलं’ काही!’ असं म्हणून चालणार नाही. आपल्या आसपास पाहू या. आपण, कुटुंब, नातेवाईक, ओळखीचे- कुठे ना कुठेतरी आणि केव्हा ना केव्हातरी आपला धागा मनोरोगाशी जोडलेला दिसेल. तेव्हा सत्याला सामोरं जाऊ या. मानसिक आजाराशी सामना करू या. आणि रोगमुक्तीसाठी ही पदयात्रा करू या! ‘रिकव्हरी इज नोइंग हू यू आर अँड युटिलायझिंग युवर स्ट्रेंग्थ्स टू बीकम ऑल यू वेअर मेंट टू बी!’
ही महापौर सूट-टाय न घालता चालण्याचे बूट व तुमच्या-आमच्यासारखा साधाच टी-शर्ट घालून आली होती. ती दोन हजारांच्या पदयात्रेत सामावून चालू लागली. एक ‘सन्मान्य’ नव्हे, तर ‘सामान्य’ नागरिक म्हणून! – प्रथम वेगवेगळे असलेले गट नंतर वेगवेगळ्या वेगामुळे परस्परांत मिसळून गेले. काळ्या-गोऱ्या, लहान-मोठय़ा, तान्ह्या-वृद्ध, लठ्ठ-बारीक, श्रीमंत-गरीब.. सर्व धर्माचा तो जनप्रवाह सरोवराच्या काठाने चालत होता. एका कौटुंबिक भावनेचा तो प्रवाह. ठिकठिकाणी पाणी देणाऱ्या छावण्या.. भोज्याच्या छावणीला ‘हाय’ म्हणत परत फिरायचं. त्या प्रवाहाचा भाग म्हणून चालण्यात ‘एक तरी ओवी अनुभवावी’चं समाधान होतं. आणि सरोवरात डोकावून  पाहताना मनाची.. मनातल्या विचारांची प्रतिबिंबं उमटत होती. जगाला हसवणारा रॉबिन विल्यम्स, नाचवणारा मायकेल जॅक्सन, माइक वोलेस सारखा खांदा पत्रकार ,नोबेल पारितोषिकाचा मानकरी डॉ. नॅश- पण असे असूनही या सर्व लोकांनी जगाला मूल्यवान योगदान केले आहे. तेव्हा They were beyond their diagnosis” !

मानसिक आजार, समाजाने रुग्णांना वाळीत टाकणे, अंधश्रद्धांचा पगडा, मनोरुग्णालयांची दुर्दशा इत्यादी प्रश्न  जागतिक स्वरूपाचे आहेत. म्हणून नामीसारख्या संस्था गावोगावीच का देशोदेशी आवश्यक आहेत. सुदैवाने पुण्यात आता “सा” सारख्या संस्था जनजागृती  आणि  रुग्ण  व नातेवाइकांना   दिलासा देण्याचे कार्य करत आहेत. डॉ. मोहन आगाशे यांच्या सारखे कलाकार आणि मनोविकार तज्ञ विविध माध्यमातून जागृती करत आहेत. डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासारखे मनोविकार तज्ञ मेळावे आणि असे उपक्रम करत आहेत. पुस्तके लिहीत आहेत. मानसिक आरोग्यासाठी तीही एक वाटचाल आहे.

नामी च्या पदयात्रेत चालताना माझ्या मनात अनेक विचार येत होते.. नात्यापासून परिचितांपर्यंतच्या स्वत:च्या विश्वातले विक्षिप्त, छळवादी, व्यसनी, ऑटिस्टिक, निराशावादी- अनेकांबद्दलचे ते विचार.. कधी सहानुभूतीचे, तर कधी रागाचे, कधी माणूस नव्यानं कळलेल्या साक्षात्काराचे, तर काही अगतिक.. नाही कशाला म्हणू? कधी कुणाबद्दल ‘त्याचा स्क्रू ढिला आहे’ म्हणून केलेल्या हेटाळणीचेही!

विद्या हर्डीकर-सप्रे

(पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता, डिसेंबर २०१५)

आयुष्याचे गणित

बहुसंख्य मुलांना त्यांच्या गणिताच्या शिक्षकाबद्दलचं मत विचारलं तर मुले जराशी घुटमळतात. म्हणजे ‘काय बोलावे’ हा प्रश्न नसतो; पण ‘काही बोलायचे तर आहे; परंतु बोलणार मात्र नाही’, किंवा ‘बोलू की नको’ असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. ‘गणिताचे शिक्षक जरा कडकच होते!’ या प्रकारात मोडणारी मुलेच जास्त आढळतात. लॉसएन्जेलिसजवळच्या एका कॅथॉलिक स्कूलमधल्या मुलांनाही तसेच वाटते. जवळपास सत्तरीला आलेले, पूर्वी अमेरिकन नेव्हीत काम केल्यामुळे एकदम ताठ मानेने शिस्तीत वर्गात येणारे, करकरीत चेहऱ्याचे त्यांचे कॅलक्युलस आणि बीजगणिताचे शिक्षक म्हणजे एकदम कडक काम! आधीच कॅलक्युलस म्हणजे अवघड गोष्ट. वर्गात नाही लक्ष दिलं, तर मेंदूची कवायतच होते. तशात तास चालू असताना क्षणभर जरी कोणी घडय़ाळाकडे पाहिलं की मास्तरांच्या काळय़ा यादीत नाव जातं. म्हणजे पुढे वर्षभर काळ्या पाण्याची शिक्षा! गणिताचे गुरुजी असलेल्या जिम ओ कॉनर यांना याबद्दल विचारलं तर ते म्हणतात, ‘अहो, १५-१६ वर्षांच्या ३० टग्या मुलांचा वर्ग म्हणजे काय कमी सजा आहे? त्यात गणितासारखा विषय! तो मुलांना नीट समजला पाहिजे. त्यासाठी माणसाला कडकच वागावं लागतं.’

‘असल्या मिलिटरी मास्तरला काळीज नावाचा एक अवयव आहे हे मला अगदी योगायोगानंच समजलं..’ असं त्यांच्या वर्गातला एक विद्यार्थी एका वाहिनीवरील कार्यक्रमात सांगत होता. ते पाहून माझं लक्ष त्या कार्यक्रमांकडे वेधलं. माझी उत्सुकता चाळवली गेली. मला वाटलं, आता ‘To sir… with love’ या सिनेमासारखी गोष्ट दाखवणार. गोष्ट दाखवली, पण अगदी वेगळ्या प्रकारची.. काळजाला हात घालणारी! हा विद्यार्थी समाजसेवेचा एक प्रकल्प करत होता : शाळेतील विद्यार्थ्यांच्या रक्तदान मोहिमेचा! आपण जे रक्त जमवणार त्याचे कोणते उपयोग केले जातात, याची माहिती मिळवण्यासाठी हा विद्यार्थी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याने आपल्या शाळेचे नाव सांगितले आणि जादूची कांडी फिरल्यागत त्याला तो एकदम ‘व्हीआयपी’ असल्यासारखाच लोक त्याला वागवू लागले. तिथल्या प्रत्येक माणसाने ‘हो? या शाळेतून तू आलास? मग जिम ओ कॉनरसर कसे आहेत? त्यांना नमस्कार सांग हं..’ अशी त्याची खातीरदारी करू लागले. हॉस्पिटलच्या प्रत्येकाला जिमसरांचे नाव कसे ठाऊक, याचा उलगडा त्याला झाला रक्तपेढीच्या विभागात! या रक्तदान केंद्रात सर्वात जास्त रक्तदान करणाऱ्या लोकांची यादी होती. त्या यादीत जिम ओ कॉनर हे नाव अगदी ठळकपणे झळकत होते.
तर- या गोष्टीची सुरुवात १९९० च्या सुमारास झाली. ‘ओ निगेटिव्ह’ हा रक्तगट असा की तो कोणत्याही रक्तगटाशी जुळतो. म्हणून या रक्तगटाच्या व्यक्तीला ‘युनिव्हर्सल डोनर’ म्हणतात.( .O- Can Be Given To O-, O+, A-, A+, B-, B+, AB- and AB+) अर्थात, या रक्तगटाला मागणीही जास्त. म्हणूनच एकदा सहज रक्तदान करण्यासाठी गेलेल्या जिमसरांनी ठरवले, की आता महिन्यातून एकदा तरी रक्तदान करायचेच. आतापर्यंत जिम ओ कॉनर यांनी ७० गॅलनपेक्षा जास्त रक्त दिले आहे. त्याशिवाय ते कर्करोगग्रस्तांना उपयुक्त म्हणून ‘प्लेटलेटस्’ही दान करतात. त्यामुळे हजारो रुग्णांना संजीवनी मिळाली आहे.
पण ही कथा तिथेच संपली नाही. आठवडय़ातून तीन दिवस शाळेत गणित शिकवणारे जिमसर उरलेले दिवस या हॉस्पिटलच्या बालरुग्ण विभागात स्वयंसेवक म्हणून काम करतात. तिथे त्यांना ‘बेबी व्हिस्परर’ असे म्हटले जाते. या विभागात अतिशय आजारी असलेली आणि पुष्कळशी कॅन्सरग्रस्त बालके असतात. पालकांना रात्रंदिवस त्यांची सोबत करताना काळजी आणि जागरणाने थकवा येतो. अशावेळी त्यांना थोडा वेळ विश्रांती देणारे tender loving care देणारे ‘ म्हणजे ममताळू स्वयंसेवक लागतात. जिमसरांनी हे काम अंगावर घेतले आहे. नव्हे, ते अंगाखांद्यावर घेतले आहे. रडणाऱ्या, वेदनेने व्याकूळ झालेल्या बालकांना जिमसरांनी कुशीत घेतले की ती शांत होतात अशी त्यांची ख्याती आहे. जिमसरांच्या आयुष्यात हे ‘ममताळू’ वळण कसे आले? रक्तदान करण्यासाठी ते आले असताना एकदा त्यांचे लक्ष या बालविभागाकडे गेले आणि तेव्हापासून त्यांची ही ‘ममताळू सेवा’ सुरू झाली. या विभागात पुष्कळ बालके अनाथ असतात. काहींचे आई-बाप व्यसनी म्हणून मुलांचा ताबा सरकारकडे असतो. काहींनी व्यसनांमुळे किंवा मानसिक आजारांमुळे मुलांचा छळ केलेला असतो. अशी आई-बाप असूनही अनाथ झालेली मुले इथे असतात. जिमसरांचं प्रेम आणि माया अशा बालकांना संजीवनी देते जिमसरांना स्वत:ची मुले नाहीत. ‘मुलाला हातावर कसं घ्यावं?’ इथून  त्यांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली. आपल्या कडक गणित शिक्षकांची ही नवी ओळख झाली तेव्हा त्यांचा हा विद्यार्थी अवाक् झाला. भारावून गेला. आणि त्याने फेसबुकवर त्यासंबंधी लिहिले. त्याला हजारो प्रतिसाद आले. चर्चचे लक्ष वेधले गेले. आणि नुकतेच जिम ओ कॉनर यांना त्यांच्या या कार्याबद्दल कार्डिनल पारितोषिक मिळाले.
न्यूयॉर्कमध्ये चारचौघांसारख्या चार-पाच मुले असलेल्या कुटुंबात वाढलेल्या जिम ओ कॉनर यांचा आयुष्याचा प्रवास वेगवेगळ्या वळणांचा आहे. बालपण संपून तारुण्याची मजा अनुभवण्याच्या वयात ते अमेरिकन नेव्हीत भरती झाले. व्हिएतनाम युद्धाचा अनुभव.. त्यानंतर न्यूयॉर्क शहराच्या रस्ते बांधणाऱ्या विभागात इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी.. आणि ही नोकरी करतानाच रात्रीच्या शाळेत पुढील शिक्षण.. असे करता करता तिसाव्या वर्षी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश.. आणि मग पदवीधर झाल्यावर नोकरीसाठी कॅलिफोर्नियात!
नोकरी करत असताना जिम तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम संध्याकाळच्या वेळी करीत असत. त्यावेळी आपल्यात दडलेला शिक्षक त्यांना सापडला. चांगली भल्यामोठय़ा पगाराची अभियंत्याची नोकरी सोडून या माणसाने शाळेतली जेमतेम पगार मिळणारी शिक्षकाची नोकरी पत्करली. त्याही नोकरीतून निवृत्त झाल्यावर आठवडय़ातून तीन दिवस गणित शिकवणे आणि तीन दिवस तान्ह्या बालकांना गोंजारणे ..असा हा प्रवास! या सर्व वळणांना एकत्र बांधणारं सूत्र आहे जिमच्या कॅथॉलिक ख्रिश्चन धर्माने सांगितलेल्या चार मूल्यांचं! सहानुभूती, नम्रता, सेवा आणि चांगुलपणा. (Compassion, Humility, service and Goodness) तो त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाचा मार्ग आहे

हा ‘way of life’ म्हणजे त्यांचा धर्म आहे. ‘धारयते इति धर्म:’ या व्याख्येत बसणारं पोषणमूल्य जिम ओ कॉनर यांच्या रक्तात आहे. वर्गात बीजगणितांचे फॉम्र्युले (सूत्रे) शिकवणाऱ्या जिमसरांना आपले काम आणि आपले आयुष्य यांचा एक ‘फॉम्र्युला’ स्वत:साठी सापडला आहे.
थोडक्यात- Sometimes we think we learn calculus, but the real lesson is LIFE.l

विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता २०१५)

‘सेल्फी’: स्वयंसेवक

लांब दांडय़ाला सेलफोन अडकवून ‘सेल्(फ) फोटो’ काढणाऱ्याचा मुखडा पाहिला आहे? एकदम आनंदी आणि विजयाचं समाधानी हसू चमकणारा!

‘योसेमिटी’ नावाचं अमेरिकेतलं राष्ट्रीय उद्यान- म्हणजे नॅशनल पार्क पाहताना हे ‘स्वयं’ भेटतात, तसेच नॅशनल पार्कमध्ये काम करणारे ‘स्वयं’सेवकही ठिकठिकाणी भेटतात. त्यांना ‘पार्क रेंजर’ म्हणतात. या राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारच्या संपत्तीवर अवलंबून न राहता आपण होऊन स्वयंप्रेरणेने मदतीचा हात पुढे करणारे हे स्वयंसेवक! मदत केल्याचा आनंद, निसर्गाचा मनसोक्त सहवास आणि आपल्याला आवडणारं काम करण्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. अशा एका जोडप्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली.

माईक आणि जॅनिस हे सुमारे ८०-८५ वयाचे स्वयंसेवक! गेली पंधरा-वीस वर्षे ते स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. दोघे कॅलिफोर्नियातल्या सॅन्फ्रॅन्सिस्कोजवळील बे एरियात वाढले. जॅनिस दहा वर्षांची असल्यापासून जवळच्या योसेमिटी पार्कला भेटी देऊ लागली. दहाव्या वर्षीच तिने आई-वडिलांबरोबर योसेमिटी नॅशनल पार्कमधील ‘हाफ डोम’ या प्रसिद्ध शिखराचा सोळा मैलांचा साहसदौरा.. ‘ट्रेक’ सुमारे दहा तासांत पूर्ण केला. जॅनिसच्या निसर्गप्रेमाची ती पहिली पायरी! त्यानंतर हा ट्रेक तिने आणखी चार वेळा केला.

आता तर हा जीवच अवघा असा जखडला।

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो॥’

अशी महानोरांच्या कवितेत भेटणारी ही जॅनिस! दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व रशियात सैनिक म्हणून काम केलेला माईक तिला भेटला आणि १९५७ मध्ये त्यांनी विवाह केला. माईकने पत्रकार म्हणून काम सुरू केले, तर जॅनिस हायस्कुलात शिक्षिका म्हणून काम करू लागली.

ते दोघे आणि यथावकाश त्यांची तीन मुले यांचं निसर्गप्रेम त्यांना दरवर्षी योसेमिटीला ओढून नेतच राहिलं. योगायोगाने पुढे त्यांचा एक मुलगा जपानला गेला, तर दुसरा न्यूझीलंडला. अर्थातच माईक आणि जॅनिसने त्या दोन्ही देशांचा निसर्ग मनमुराद अनुभवला. माईकला सैन्यातल्या कामामुळे रशियन येते. त्यामुळे दोन वर्षे आपापल्या कामांतून सुट्टी घेऊन हे दोघे रशियातला निसर्ग अनुभवण्यासाठी गेले. क्रोएशिया, स्विस आल्पस्, पँटागोनिया, दक्षिण अमेरिका, स्पेन असे अनेक निसर्गरम्य प्रदेश या जोडीने पालथे घातले. Travel bug bites you. जॅनिसने आपल्या चिरप्रवासी वृत्तीचे हसत हसत वर्णन केले. खिशात फारसे पैसे नसताना आणि तीन मुलांचा संसार सांभाळून आपला प्रवासाचा छंद सांभाळायचा म्हणजे काही स्वस्त आणि मस्त युक्त्या कराव्याच लागतात. स्वयंसेवक म्हणून काम करण्याची युक्तीही अशीच सुचली. दोघांना जेवढा निसर्ग प्रिय, तेवढेच संगीतही! मग जॅनिसने सॅन्फ्रॅन्सिस्कोतील एका ऑपेरा थिएटरमध्ये संध्याकाळचे स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले. थिएटरचे महागडे कार्यक्रम विनामूल्य ऐकण्याची सोय झाली. त्यातून काही दक्षिण अमेरिकन, काही स्पॅनिश मित्र मिळाले आणि त्या देशांत स्वस्त राहण्याच्या सोयी समजल्या. अशा तऱ्हेनं त्यांना निसर्गप्रेम, संगीतप्रेम, प्रवासप्रेम एकत्रच साधता आले.

१९७० च्या सुमाराला माईक आणि जॅनिस योसेमिटी असोसिएशनचे सभासद झाले आणि त्यांच्या प्रकल्पांत भाग घेऊ लागले. तिथला साठ मैलांचा सात दिवसांचा एक साहसदौरा (हाय सियारा लूप ट्रीप) या जोडप्याने केला. बरोबर तीस लोक होते. आणि त्यांचा नेता होता एक पार्क रेंजर स्वयंसेवक! त्यातून या जोडप्याला ‘पार्क रेंजर’ म्हणून स्वयंसेवकगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. पत्रकार माईकच्या निसर्गप्रेमाच्या बहराने त्याला फुलांचं वेड लावलं आणि त्याने बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्राचे धडे गिरवले. तो त्याबद्दलचे लेख त्याच्या वृत्तपत्रात लिहू लागला.

आपापल्या पोटापाण्याच्या कामातून जरा सवड झाल्यावर आणि मुलांची जबाबदारी कमी झाल्यावर माईक आणि जॅनिसने पार्क रेंजर म्हणून कामाला सुरुवात केली. महिन्यातून १२ ते २० दिवसपर्यंतही ते काम करतात. पार्कमध्ये स्वत:चा तंबू ठोकायचा. ‘आठवडय़ाची पाच जेवणे, रोज विनामूल्य स्नानाची सोय आणि दिवसाला दहा डॉलरचे मानधन यावर मजेत राहता येते..’ असे माईकने सांगितले. ‘मग तुम्हाला प्रशिक्षण वगैरे मिळतं का?’- ‘प्रशिक्षण? छे! फक्त एक तासाचं. बाकी सर्व ‘On job!’  जॅनिस हसत हसत म्हणाली. ‘उदा. हायकिंगची माहिती देण्याची कामगिरी असली तर माणसांचे पाय पाहावेत आणि ते कोणत्या वेळेला उगवले ते पाहावं. पायात चपला असल्या अणि वेळ दुपारची- तर अध्र्या मैलाच्या चिमुकल्या साहस

-सफरीचा सल्ला द्यायचा, हे सुचतंच आपोआप. हेच On job Training!

तेव्हा हे ‘सेल्फ लर्नेड’ ‘सेल्फी : स्वयंसेवक’ प्रवास मार्गदर्शन केंद्रात, कलादालनात, ‘नेचर वॉक’ मार्गदर्शक म्हणून ‘रानझुडपांचे संरक्षण किती महत्त्वाचे!’ याबद्दल लोक जागृती करणारा व्याख्याता म्हणून अशी विविध प्रकारची स्वयंसेवा करतात. हे करत असतानाच लोकांना काय ऐकायला आवडतं, काय नाही, याचा अंदाज येतो. त्यांना काय जमतं, हे माहिती नसल्याने सूचना देताना काळजी घ्यावी लागते. म्हणजे हायकिंगचे मार्गदर्शन करताना kI recommend you this traill  असं म्हटलं तर त्यांना आवडत नाही. त्याऐवजी kl like to do this trail- you will like it! असं म्हणायचं- म्हणजे उगाच ‘तुला हे जमणार नाही’ असा सपकारा मारण्याऐवजी  ‘याच्याऐवजी ती वाट घेतलीस तर तुला छान छान फुलं भेटतील..’ असं गोड हसून सांगायचं.

योसेमिटीशिवाय आणखीन काही राज्य उद्यानांतही (state parks) माईक आणि जॅनिस काम करतात. तिथे प्रशिक्षण जास्त मिळतं. ९० तास प्रशिक्षण, ट्रेकिंगसाठी फिल्ड ट्रिप्स- म्हणजे अभ्यास सहली, दरवर्षी उजळणी वर्ग, महिन्यातून एकदा स्वयंसेवक मेळावा अशा शिकण्याच्या अनेक संधी मिळतात. हे सर्व शिक्षण उत्साहाने घेणाऱ्या माईक आणि जॅनिसचा आणखी एक छंद समजला, तो म्हणजे नवं काही शिकण्याचा! स्वयंसेवक म्हणून काम करताना आपल्याला ‘नित्यनवा दिवस जागृतीचा’ अशी संधी मिळते आणि आपलं जीवन केवढं समृद्ध होऊ शकतं, हे माईकशी बोलताना पुन्हा एकदा मनात अधोरेखित झालं. एवढय़ा सगळ्या वर्षांत जॅनिसला एकच वाईट असा अनुभव आला.. ‘बोरेगा स्प्रिंगज्’ या स्टेट पार्कमध्ये! एक बाई तणतणत तिला म्हणाली, ‘इथे ‘झरा’ कुठेच नाही. मग याचं नाव ‘बोरेगा स्पिं्रग’ कशाला ठेवलंत? नाव बदला! उग्गाच तडमडत आलो आम्ही इथे!’ इ. इ. ‘स्वयंसेवकाची विनोदबुद्धी चांगली असावी लागते’ हे माझं प्रशिक्षण करणारी तिची ही आठवण!’ जॅनिस सांगत होती. ऐंशी वर्षे उलटून गेल्यावरही जॅनिसची तब्येत खणखणीत असण्याचं तिचं रहस्य म्हणजे तिची (आयुष्यभर मुलांच्या हायस्कुलात शिकवूनही!) सणसणीत विनोदबुद्धी, निसर्गाशी नातं, संगीताचं प्रेम आणि नवीन शिकण्याचं परकऱ्या पोरीचं औत्सुक्य! स्वयंसेवक म्हणून काम करताना कधी लोकांना आपण खूप काही आश्वासनं देऊन बसतो. मग ती पुरी करताना चांगलीच तारांबळ उडते. ‘नाही’ कसं म्हणायचं, ते समजत नाही. (How to say ‘no’ is an art after all’’) हे सगळं मान्य करूनही या दाम्पत्यानं ‘स्वयं’ हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो हे ओळखून, स्वत:ला काय आवडतं ते समजून घेऊन स्वत:साठी जगण्याचे हे प्रयोग केले आहेत. ‘सेल्फी’ला हेतूची चौकट दिली आहे. ‘हेतूचं भान असलं की खारीच्या (पाठीला चिकटलेल्या) वाळूच्या कणालाही अर्थ येतो..’ हे तर साक्षात् बाबा आमटे म्हणून गेलेत! ‘स्वयं’सेवक होण्याचा माईक आणि जॅनिसचा निर्णय स्वयंप्रज्ञेतून आलेला; म्हणूनच तर दिसली त्यांच्या छबीवर न ढळणारी प्रसन्नता आणि विजिगीषू समाधान!

विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्र्सिद्धी : लोकसत्ता, 4 ऑक्टोबर, 2015)

भव्यत्वाची जेथे प्रचीती

अमेरिकेतील भव्य, प्रेक्षणीय स्थळ म्हटले की सहजपणे लोक ग्रँड कॅन्यन नॅशनल पार्कचे नाव घेतात! हा देश सुमारे ५८ भव्य नॅशनल पार्कस्च्या सौंदर्याने नटला आहे. नावाप्रमाणेच असलेले, कोलोराडो नदीने लाखो वर्षे खोदून निर्माण केलेले हे ‘ग्रँड कॅन्यन’ आहे. तसेच युटा अणि अ‍ॅरिझोना राज्यांच्या सीमांवरचा प्रदेश अनेक अद्भुत निसर्गशिल्पांनी आणि लाल, केशरी, गुलाबी, पिवळ्या रंगच्छटांनी उजळून गेलेला आहे. त्यातील एक सुमारे २३० चौरस मैलाचा भव्य आणि नेत्रदीपक चमत्कार म्हणजे ‘झायॉन नॅशनल पार्क’! (Zion National Park) समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फुटांवर या चमत्काराचा तळ आहे. आणि ८००० फुटांवर याचा पहाडी शिरपेच आहे! माणसाला नम्र करणारे उत्तुंग पाषाणांचे पहाड, उंचीवरून स्तिमित करणारी विस्तीर्ण पठारे आणि उसळत, कोसळत खळाळणारे प्रपात! (त्यांना धबधबे म्हणणं म्हणजे नायगाऱ्याला ‘नळ’ म्हणण्यासारखं वाटतं!) –

खरं तर ‘उत्तुंग’, ‘भव्य’, ‘प्रपात’ वगैरे शब्दसुद्धा खुजे वाटावेत असं या भागाचं स्वरूप आहे. ‘झायॉन नॅशनल पार्क’ हे तिथे प्रत्यक्ष जाऊनच अनुभवावं असं आहे. हजारो नव्हे, तर लाखो वर्षांपूर्वी इथे होती एक नदी (अजूनही आहे). ‘व्हर्जिन रिव्हर’ हे तिचं नाव! खळखळ धावत, फेसाळत, उसळत जाता जाता इथल्या ‘सॅन्डस्टोन’च्या प्रदेशात तिनं खोदली पाषणशिल्पं! कदाचित काही भूकंप झाले असतील, कुठे पहाड कोसळले असतील.. इतिहासाच्या खाईत! कधी पाण्यातून उभे राहिले असतील पर्वत! त्या सर्व घटनांच्या नोंदी इथल्या पहाडांवर, दगडांवर निसर्गत:च उमटल्या आहेत. पहाडांवर दिसणाऱ्या लाटांच्या जन्मखुणा, पर्वतांचे कातीव कंगारे, निळ्याभोर आकाशावर रेलून राहिलेली लाल- केशरी गोपुरांनी नटलेली रेखीव शिखरे हे सर्वच अंतर्मुख करून जाणारं! दरवर्षी तीन दशलक्ष लोकांना विविध प्रकारे गुंतवून ठेवणारा हा प्रदेश १९१९ च्या सुमाराला ‘नॅशनल पार्क’ म्हणून ठरवला गेला. आणि त्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी रस्ते बांधले गेले. राहण्याच्या सोयी केल्या गेल्या. संग्रहालय बांधले. आणि ३५-४० पायवाटाही बांधल्या! त्याशिवाय पाठीवर बॅगपॅक घेऊन ट्रेकिंग करणाऱ्या साहसवीरांसाठी सुमारे १०० मैलांच्या रानवाटाही शोधून, नोंदवून नकाशे बनवण्यात आले. त्यांच्यासाठी चाळीसेक विश्रांतीस्थळांच्या सोयी करण्यात आल्या. निसर्गाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचं हे एक दालन आणि साधनही आहे याचा विचार अर्थातच केला गेला. आणि पर्यटक, साहसवीर यांच्याप्रमाणेच संशोधक आणि अभ्यासकांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प सुरू आहेत. –

त्यात इथला भूगोल, भूगर्भशास्त्र, पर्यावरण, निसर्गसंपत्ती, वनसंपदा, आणि वन्यप्राणीजीवन असे सर्वच विषय आहेत. चित्रकार, छायाचित्रकार अशा कलाकारांसाठी तर हा खजिनाच आहे. या सर्वाना सेवा मिळण्यासाठी सरकारी आणि स्वयंसेवक असे सर्वच कार्यकर्ते हसतमुखाने तत्पर असतात. पार्कचा काही भाग पाहण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी मोफत बसची व्यवस्था आहे. कधी पायी जावं आणि हजार प्रकारच्या वनस्पती पाहाव्यात. तर कधी २०० प्रकारचे पक्षी असलेल्या या प्रदेशात पक्षीनिरीक्षणाचा आनंद घ्यावा. कधी रानफुलांचे नमुने गोळा करावेत. वाटेत एखादा ‘टॅरंच्युला’ (tarantula) म्हणजे मोठ्ठा विषारी कोळी दिसला तर घाबरावे; पण आश्चर्यचकित होऊ नये!
जरा जास्त साहसी ट्रेकर्सना खुणावतो तो ‘नॅरोज’ हा भाग. नावाप्रमाणेच हा झायॉन पार्कमधील सर्वात अरुंद भाग! म्हणजे भोवती हजार- दीड हजार फुटांची उंच पर्वताची रांग आणि मधे जेमतेम २० फुटांची वाट. काही भाग व्हर्जिन नदीचा. या प्रवाहातून उलटय़ा दिशेने जाण्याचा हा ट्रेक आहे. तसा खूप अवघड नव्हे. पण आव्हान देणारा आणि त्याचवेळी डोळ्यांचे पारणे फेडणारा! अचानक वेगाने पूर येऊन धोका देणाराही! दोन-तीन महिन्यापूर्वीच या नॅरोजने सात साहसवीरांचा बळी घेतला. –

‘झायॉन’चा भाग ‘भीमरूपी’, ‘भव्यरूपी’ आहे, तसाच महारौद्ररूपीही आहे. पहाडांचे कातळ कोसळणे हा प्रकार कधी कधी होतो.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ातली गोष्ट. आमच्या इंग्लंडहून आलेल्या मित्रांना ‘ग्रँड कॅन्यन’, ‘ब्राईस कॅन्यन’ आणि ‘झायॉन कॅन्यन’ अशा तीन नॅशनल पार्कची सफर घडवण्याचा बेत आम्ही केला होता. ग्रँड कॅन्यनहून निघून आठ तासांचा प्रवास करून आम्ही झायॉनच्या एका प्रवेशद्वाराच्या दिशेने चाललो होतो. २३ सप्टेंबरची ती संध्याकाळ. तिथून प्रवेश करून तासभर प्रवास करून ‘झायॉन’ची झलक पाहुण्यांना दाखवायची आणि दुसऱ्या टोकाच्या प्रवेशद्वारामार्गे बाहेर पडून स्प्रिंगडेल या चिमुकल्या गावात मुक्काम करायचा, असा बेत! पण प्रवेशद्वारी गाडय़ांची मोठ्ठी रांगच रांग! कोणाला आत जाऊ देत नव्हते. द्वारपालांनी सांगितले की, आत रस्त्यावर १९ फूट ७ २० फूट ७ १५ फूट आकाराचा दोनशे टनांचा एक दगड कोसळला आहे आणि रस्ता बंद आहे! आता तो दगड सुरुंगाने उडवून फोडायचा की यंत्राने ढकलून बाजूला करायचा, या प्रश्नाची सोडवणूक चालू आहे. आता मार्ग बदलून वळसा घालून स्प्रिंगडेलला पोहोचण्यास तीन तास लागले असते. आमच्यासारखे अनेक प्रवासी व पर्यटक मागे परतून जवळपासचे हॉटेल शोधत होते. आम्हीही तेच केले. रात्री एका शेतावरच्या फार्म हॉटेलवर मुक्काम केला. ‘कंट्री म्युझिक’ ऐकत शेकोटीजवळ बसलो. नंतर खोलीच्या बाहेर पायऱ्यांवर – बसून सुंदर चांदणे अंगावर घेतले. आकाशगंगेचे दर्शन घेतले. इंग्लंडच्या पाहुण्यांना अमेरिकेच्या निसर्गरम्यतेचा वेगळा अनुभव मिळाला. ‘झायॉन’च्या ‘भव्य’त्वाची प्रचीती मग दुसऱ्या दिवशी वेगळ्या मार्गाने जाऊन घ्यावी लागली. काही भाग सोडला तर उरलेल्या सर्व ‘झायॉन’ पार्कचा अनुभव पाहुण्यांनी घेतला. प्रत्येक भागाचे दर्शन त्यांना ‘आश्चर्य’चकित करीत होते. आमची ही झायॉनानंदाची पाचवी-सहावी सफर असेल. पण दरवेळी होतो तसा ‘आ’ वासण्याचा आनंद तेवढाच प्रत्ययकारी आणि ‘कर माझे जुळती’ची प्रचीतीही!

विद्या हर्डीकर सप्रे

(पूर्व प्रसिद्धी: लोकसत्ता , नोव्हेंबर 15, 2015)

निसर्गाचे रुणझुण गाणे

गाडी महामार्गावरून धावते आहे. दोन्ही बाजूला बदाम, संत्र्या-मोसंब्याच्या, पिस्त्याच्या फळबागा मैलोन् मैल पसरलेल्या. कॅलिफोर्नियातल्या दुष्काळाचे सावट पडून मधली काही मैलांची फळबाग वाळून गेलेली. मन विषण्ण करणारी.
हळूहळू उंच वनराजी डोकावू लागते. गाडी थांबते. खिडकीतून हसरा, प्रेमळ, खाकी गणवेशातला रेंजर आमचे प्रवेशपत्र पाहतो. आमचे स्वागत करतो. हातात नकाशा आणि वर्तमानपत्रासारखी दिसणारी मार्गदर्शिका देतो. आम्ही पुढे निघतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच सूचिपर्णी वृक्षांचे दाट जंगल. कुठे लहानशी सपाट कुरणाची हिरवाई.. बालकवींची आठवण देणाऱ्या निजबाळांसह बागडणाऱ्या सुंदर हरिणी हिरव्या कुरणी. मधेच बाजू्च्या टेकाडावरून दर्शन देणारी सवत्स अस्वलीण.गाडी विसावली. आम्ही पाऊलवाट धरली. ‘तो वारा फिरतो शीळ मुक्त घालतो’ अशी शंकर रामाणींच्या कवितेची आठवण देणारी! वाऱ्याच्या सुरात आता पाण्यानं ताल धरला आहे. वृक्षराजीच्या हिरव्या सतारी गुणगुणत डोलताहेत. त्यावर उन्हाचा कवडसा आणि पाण्याच्या तुषारांची इंद्रधून! समोर आहे योसेमिटीचा तीन-ताली प्रपात.. निसर्गाचं रुणझुणतं गाणं. हजारो वर्षे निसर्गाचे बदलते ऋतू या मैफलीत रंगून गेले आहेत. प्रत्येक बदलता ऋतू या संगीतवृंदाला नवनवीन चैतन्याचा साज चढवतो.योसेमिटी राष्ट्रीय उद्यान- योसेमिटी व्हॅली आणि ११०० चौरस मैलाचा हा अफाट परिसर म्हणजे साक्षात् चैतन्य आहे. दोन तासांपासून दोन हजार वर्षे आयुष्य असलेल्या फुले, पाने, झाडे, पक्षी, प्राणी, किडेमकोडे अशा अनेक सजीवांचं हे जीवनचरित्र आहे. कुणी त्याला म्हटलं आहे-‘Vibrant Tapestry of Life’!

काही हजार वर्षांपासून या अनाघ्रात परिसराला माणसांचा स्पर्श होऊ लागला. त्यांना ‘या वस्त्राते विणतो कोण’ असा प्रश्न कदाचित पडला असेल का? योसेमिटीच्या परिसरानेही येणाऱ्या माणसांना बदलले आहे. अवानिची ही अमेरिकन इंडियन (आपण ‘रेड इंडियन’ म्हणतो.) जमात इथे प्रथम आली असावी.१८०० च्या समारास युरोपियन्स येऊ लागले. त्यांनी घोडय़ावरून या प्रदेशातल्या वाटा शोधल्या, तशीच सौंदर्यस्थळेही! काही इथल्या भव्य, सुंदर कातळी पहाडांनी स्तिमित झाले. इथल्या जित्याजागत्या निसर्गाचं विराट रूप त्यांना दिपवून गेलं. त्यांनी लेखक आणि चित्रकारांना बोलावलं. वर्णनं चित्रित केली व जगाला या परिसराची ओळख करून दिली. कोणाचातरी गैरसमज झाला की ‘योसेमिटी’ हा शब्द म्हणजे रेड इंडियन जमातीचे नाव आहे. त्यानं या परिसराला नाव दिलं- ‘योसेमिटी’!काहीही असो- या परिसरात नवे लोक येऊ लागले. सर्वच सौंदर्यपूजक नव्हते. काही सुवर्णपूजक होते. त्यांना इथली वृक्षराजी म्हणजे सोन्याची खाण वाटली. जंगलतोड सुरू झाली. काहींना अक्षरश: सोन्याची खाण सापडेल असे वाटले! मग अनेक अर्थानी ‘गोल्ड रश’ सुरू झाला. याला वाली कोण? या मनुष्यधाडीपासून या सुंदर परिसराचं रक्षण कोणी करायचं? अनेक रक्षणवादी आणि निसर्गप्रेमींनी गाऱ्हाणं मांडले आणि १८६४ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी योसेमिटीची संपूर्ण दरी व

भव्य परिसर कॅलिफरेनिया राज्याकडे सुपूर्द केला. त्याआधीच इथे एका हॉटेलच्या व्यवस्थापनासाठी नेमलेला तिशीतला जॉन म्यूर नावाचा तरुण या परिसराच्या प्रेमात पडला. खूप भटकला. नकाशे तयार केले. लेख लिहिले. राज्याच्या तुटपुंज्या पैशातून या परिसराचं संरक्षण करण्यापेक्षा अधिक काही महत्त्वाचं घडावं असं त्याला वाटलं. ही नुसती राष्ट्रीय संपत्ती नाही, तर तो राष्ट्रीय विसावा आहे असं त्याला वाटे. त्यानं भव्य स्वप्न पाहिलं की, जागोजागी अशी निसर्गमंदिरं.. राष्ट्रीय उद्यानं व्हावीत! त्याच्याच शब्दात सांगायचं तर- Thousands of tired, nerve shaken, over civilized people are beginning to find out that going to mountains is like going home. Wilderness is necessary.

अखेर या द्रष्टय़ाच्या प्रयत्नांना यश आले. १८९० साली बेंजामिन हॅरिसन या अमेरिकेच्या अध्यक्षांनी हा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केला आणि कायद्याचे शिक्कामोर्तब केले. कॅलिफोर्निया राज्याकडून ते मध्यवर्ती सरकारकडे पुन्हा गेले. अमेरिकन संरक्षण खात्याने सैनिक नेमून त्याचे संरक्षण आणि प्रगती सुरू केली.

जॉन म्यूर इथेच थांबला नाही. त्याने नंतरचे अध्यक्ष थिओडर रुझवेल्ट यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना हे उद्यान पाहण्याचे निमंत्रण दिले. १९०३ मध्ये अध्यक्ष आले. त्यांनी तीन रात्री तंबूत राहून या परिसराचा परिसस्पर्श अनुभवला. जॉन म्यूर आणि रुझवेल्ट यांची भेट म्हणजे दोन निसर्गप्रेमी दार्शनिकांचीच भेट! त्यानंतर रुझवेल्ट यांनी अमेरिकन लोकांसमोर एका भाषणात सांगितले, National Parks are for the benefits and enjoyment of the people.’ आज अमेरिकेत सुमारे ४०० राष्ट्रीय उद्याने आहेत. एकटय़ा योसेमिटी राष्ट्रीय उद्यानाला चार दशलक्ष लोक दरवर्षी भेट देतात. १९१६ मध्ये सरकारने राष्ट्रीय उद्यान सेवा विभाग (National Park Service) सुरू केला. त्यात २० हजार पगारी आणि अनेक बिनपगारी स्वयंसेवक काम करतात. शिवाय अनेक स्वयंसेवी संस्था या राष्ट्रीय संपत्तीच्या जपणुकीसाठी झटून काम करतात. पगारी वा बिनपगारी असोत- प्रत्येक रेंजर प्रेमाने, आपलेपणाने मदत करतो. निसर्गसहली, मेळावे, मुलांसाठी माहितीचे कार्यक्रम, उद्यानांची स्वच्छता आणि व्यवस्था, अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका, छायाचित्रांचे छंदवर्ग, रात्रीच्या सुंदर नक्षत्रखचित आकाशाची ओळख..

शुभ्र तुरे माळून आल्या

निळ्या निळ्या लाटा

रानफुले लेवून सजल्या

या हिरव्या वाटा..

मंगेश पाडगावकरांची ही कविताच हे रेंजर उलगडून दाखवतात. राष्ट्रीय उद्यान ही अमेरिकेची सर्वागसुंदर संकल्पना आहे. या कल्पनेनं अ‍ॅन्सेल अ‍ॅडम्ससारख्या

जगप्रसिद्ध छायाचित्रकाराला वेड लावलं आणि त्यानं आपलं बहुतेक आयुष्य योसेमिटीला वाहिलं. लिंकन, हॅरिसन, रुझवेल्ट हे तीन अध्यक्ष आणि म्यूर, अ‍ॅडम्ससारख्या स्वप्न-शिल्पकारांच्या प्रयत्नांतून सर्वसामान्य माणसांसाठी उलगडलेलं हे भव्य, सुंदर, जिवंत, सदाबहार महावस्त्र!

अशा कित्येक आठवणी योसेमिटीच्या निसर्गाशी कायमचं नातं निर्माण करून गेल्या आहेत. 2015 मध्ये त्याचा १२५ वा वाढदिवस. . 2014 हे लिंकनने त्यास मान्यता दिल्याचं दीडशेवं र्वष होतं.

यापूर्वीही कितीतरी वेळा इथे येण्याचं भाग्य लाभलं. किती रानफुलं पाहिली. किती सुंदर जागी ट्रेकिंग केलं. आप्तांबरोबर ‘हाफ डोम’च्या साक्षीनं छायाचित्रे काढली. मित्रांबरोबर ग्लेशियर पॉइंटवर अंगतपंगत केली. कित्येकदा ‘मिरर लेक’मध्ये उमटलेली पर्वतांची प्रतिबिंबं पाहिली. अनेकदा आकाशात उमटलेल्या सप्तर्षीचं दर्शन घेतलं. आणि ‘एकच तारा समोर’ असं ध्रुवदर्शन करताना कुसुमाग्रज आठवले. समोरचा तीन-ताली योसेमिटी धबधबा पाहताना ही आठवणींची स्वरधून मनात पुन्हा उमटते आहे. ‘तुझ्या स्वरमेळात माझ्याही क्षीण सुराची एक तान’ असं म्हणणाऱ्या रवींद्रनाथांची कविता आठवते आहे.

विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता ,2015)

जलतरंग

परवा परवाची गोष्ट! मी एका कंपनीत काही माहिती मिळवायला गेले होते. मी वाट पाहत बसले होते. माझी तिथल्या माहिती विभागाच्या कोणाबरोबर तरी गाठभेठ ठरली होती. ठरल्या वेळी बाहेर आली शेलाटी, हसऱ्या डोळ्यांची.. ”हाय, माझं नाव पॅट!” तिनं ‘शेकहँड’साठी हात पुढे केला आणि एकदमच आम्ही दोघी एकमेकींकडे पाहत म्हणालो, ”ओ, हाय! व्हाट आर यू डुइंग हीअर?” आणि मग आम्ही एकमेंकींना मिठीच मारली आनंदाने!
मला तब्बल पाच वर्षांनी पॅट भेटली अशी अनपेक्षितपणे! माझ्या मनात आठवणी जाग्या झाल्या! खरं तर अलंकारिक भाषेत ‘आठवणींचे जलतरंग’ उमटले! मी पाहिल्याक्षणी तिला ओळखलं नाही. कारण मी पूर्वी तिला फक्त पोहोण्याच्या कपडय़ात पाहिलं होतं! शर्ट-पँटमध्ये पाहिलं नव्हतं फारसं!
गेल्या पाच काय, खरं तर आठ वर्षांत पॅट फारशी बदलली नव्हती. हो. आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. घाईघाईत काहीतरी करताना धडपडले आणि गुडघा दुखावला

डॉक्टरांनी निदान केलं-‘मिनिस्कस फाटलं!’ आता ‘मिनिस्कस’ नावाचा अवयव मी कधी ऐकलाच नव्हता. पण गुडघ्याच्या सांध्यात ‘डोनट’च्या आकाराचा हा स्नायू असतो खरा! मग व्हायचे ते सगळे ‘सर्जनी’ सोपस्कार झाल्यावर कोणीतरी मला सुचवलं, ‘वॉटर थिरपी’ घे.. चांगली तुझ्या गुडघ्याला.” ‘. ट. उ. अ.’ नावाच्या संस्थेत पोहण्याचा तलाव असतो आणि तिथे ‘वॉटर अ‍ॅरोबिक्स’चे क्लासेस असतात हे समजल्यावर मी घराजवळच्या ‘. ट. उ. अ.’मध्ये नाव नोंदवलं. सकाळी सातपासून हे ‘जल’द व्यायामाचे वर्ग होते. मला सोयीची वेळ- तास झाल्यावर परस्पर कामाला जाणं वेळेत बसलं. आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षे मी पॅटच्या तासाला जात राहिले. माझा पायच नव्हे, तर फार वेळ बसून बसून कुरकुरणारी पाठही सरळ झाली!

शास्त्रीय परिभाषेत नाही, पण साध्या शब्दात सांगायचं तर घामाघूम होण्यापर्यंत दमवणारा व्यायाम म्हणजे ‘अ‍ॅरोबिक’ होय. त्यात हृदयाचे ठोके जलद पडतात, वगैरे! उडय़ा, पळणे असं काही काही! जे ‘स्थळी’ ते ‘जळी’- म्हणजे पाण्यात केलं की त्याला ‘वॉटर अ‍ॅरोबिक्स’ म्हणजे ‘जल’द व्यायाम म्हणायचं. जलोपचारांतला हा ‘जल’द उपचार म्हणायचा. ‘पाणी’ म्हणजे जादूगार.. किमयागार! हृदयाचे ठोके न वाढता, फारसं घामाघूम न करता हृदयाचा रक्तपुरवठा वाढवणारा, कॅलरीचा साठा जाळणारा व्यायाम पाण्याच्या अनोख्या जादूमुळे करता येतो. हा व्यायाम कमरेइतक्या पाण्यात उभं राहून करता येतो. पोहणे येण्याची आवश्यकता नसते. पाण्यात वस्तूला उचलून धरण्याची किमया आणि (बॉयन्सी- ) तरीही हालचालींना विरोध करण्याची जोरकसता एकाच वेळी! त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते. शरीराचा तोल सांभाळण्याचं कौशल्य वाढतं. हात-पाय-मेंदूचं सांघिक काम सुधारतं. स्नायूंची लवचिकता वाढते- आणि आरामही! शिवाय हाडं बळकटीला मदत होते. पाण्यातून बाहेर पडल्यावर शरीर आणि मन हलकं, ताजं, टवटवीत होतं. स्नायूंच्या वेदना शमतात.
पाण्यात पडण्याची भीती नसते आणि
बॉयन्सी- मुळे लठ्ठ माणसालाही हालचाल सोपी वाटते. थोडक्यात, ‘एका दगडात थवा’ किंवा ‘एका खडय़ात अनेक जलतरंग’ म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच की काय, जलोपचार, जलदोपचार ‘योगा’ आणि ‘ताय ची’ (Tai Chi) हा प्रकार या सर्वावर ‘अमेरिकन आथ्र्रायटिस फाऊंडेशन’ या संस्थेने, अस्थिरोगतज्ज्ञांनी आणि मज्जासंस्थातज्ज्ञ (न्यूरो सर्जन्स) यांनी आशीर्वादाचे शिक्कामोर्तब केले आहे. पाण्यातल्या योगासनांना ‘जलयोग’ (वॉटर योगा) आणि पाण्यातल्या ‘ताय ची’ला ‘अ्र उँ्र’ म्हणतात. पार्किन्सन्स म्हणजे कंपवात, मल्टिपल स्केरॉसिस हा मज्जासंस्था/स्नायूंचा आजार, स्ट्रोक-म्हणजे अर्धागासारखे प्रकार, हाडेमोडी आणि अनेक प्रकारच्या अपघाती दुखापती या सर्वासाठी हे जलोपचार आणि व्यायाम असतात.
२००८ मध्ये अमेरिकन आरोग्य खात्याने या सर्व फायद्यांत आणखी काही नोंदींची भर घातली- ‘जलदोपचाराने रक्तदाब म्हणजे ‘ब्लड प्रेशर’ कमी होऊ शकते.. शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त वाढणारे ‘लॅक्टिक अ‍ॅसिड’ कमी होण्यास मदत होते. एकंदरीत या ‘आखूड शिंगी, बहुगुणी, बहात्तर रोगांवर अक्सीर इलाज’ इ. उपचारांबद्दल मला काहीही माहिती नसतानाही मी तीन वर्षे पाण्यात डुंबून मजा केली ती ‘पॅट’मुळे! ही माहिती मला समजली तीही पॅटमुळे. आणि त्याहीपूर्वी मी काही फायदे अनुभवले ते तिच्याचमुळे! शिवाय मला ४०-५० नवीन मैत्रिणी मिळाल्या, ही पाणी आणि ‘जलतरंग’ उमटवणाऱ्या पॅटचीच देणगी! सकाळी सात ते आठचा तास. पॅट येते ती किलबिलत, हातात ‘बूम बॉक्स’ म्हणजे गाणं वाजवणारी कोणतीतरी पेटी घेऊन! (सी. डी. प्लेअर- कॅसेट प्लेअर.. असलं काही!) पाण्यात चाळीसेक विविध वयाचे, आकारांचे विद्यार्थी! पॅट पाण्यात उतरून आधी हातापायांचे व्यायाम करायला लावते. मग सरळ सांघिक कवायतींचे प्रकार! हास्यविनोद, गप्पा.. आणि एक साथ- वन् अँड टू अँड.. अशा सूचना. तास कसा संपतो ते समजत नाही. प्रत्येकीला ती नावानं ओळखते. कोणी आलं नाही की ‘बरी आहेस ना?’ म्हणून फोन करून चौकशी! दरमहा वाढदिवस साजरे. तास संपल्यावर सर्वानी (कुडकुडत) एका खोलीत जमून केक कापायचा. कोणी खाऊ करून आणत, तो वाटून खायचा- मजा करत! आमच्या वर्गातल्या सर्वात मोठय़ा- म्हणजे ९० वर्षांच्या बाईचा वाढदिवस साजरा करताना विशेष मजा! तेव्हा पॅटचं वय समजलं- ६८ वर्षे!
तलावातलं पाणी कोमट असतं. पाण्यात शिरताना फार बिचकावं लागत नाही. क्लोरिनमुळे आमचे ‘स्विम सूट्स’ म्हणजे ‘जल’कपडे फार ‘जल’द फाटून (दोन महिन्यांत) जात. बाजारात स्वस्त ‘सूट’ आले की सगळ्या एकमेकींना वार्ता देत. तास संपल्यावर आंघोळीचा हमामखाना सार्वजनिक! एका खोलीत २५ शॉवर्स टांगलेले! अपंग, सुरकुत्यांचं जाळं असलेल्या, काही थुलथुलीत, काही शस्त्रक्रियांचे ओरखडे अंगावर वागवत.. सर्व प्रकारच्या स्त्रिया- माणसांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. धडधाकट शरीराचं वरदान मिळाल्यानं भाग्यवान वाटू लागलं. ‘अनुकंपा’, ‘कृतज्ञता’ या शब्दांचे अर्थ जरासे समजू लागले.
अपंग लोकांना तलावात उतरण्यासाठी यांत्रिक खुर्चीची सोय असते. एकदा त्यावरून एक २५ वर्षांची मुलगी खाली उतरवली. बरोबर तिची आई. मुलीला धड बोलता येत नव्हतं. पाण्यात काहीही करणं तिला कठीण होते. त्यामुळे विषण्ण होऊन, अगतिकपणे ती चिडचीड करत होती. दोन महिन्यांनी तिला एखादी गोष्ट जमू लागली तेव्हा तिनं तिच्या परीनं हसून तो आनंद साजरा केला. आम्ही सर्वानी उत्साहानं टाळय़ा वाजवल्या. घरात एकटी असताना ही हसतीखेळती मुलगी धडपडली आणि डोक्यावर आपटली. ‘९११’ या फोनसेवेला फोन करण्यासाठी ती उठू शकली नाही. वेळीच मदत मिळाली नाही. परिणामी मेंदूला रक्तपुरवठा मिळाला नाही.. किंवा असंच काही. मुलगी लुळीपांगळी झाली! तिची कथा ऐकताना हळहळ वाटली. अशा अनेक गोष्टी.. आमचं सर्वाचं एक कुटुंब झालं होतं!

या पाण्यानं तीन वर्षांत मला नुसतंच बरं केलं नाही, तर ‘जीवन’गाणं शिकवलं! नंतर आम्ही घर बदललं आणि माझा तो ‘जीवन’बंध सुटला. परवा पॅट भेटली आणि ते सगळे ‘जलतरंग’ मनात उमटले!

विद्या हर्डीकर-सप्रे

(पूर्व प्रसिद्धी : लोकसत्ता , 3 मे 2015)

दुष्काळ फार झाला, पाणी जपून घाला

कॅलिफोर्नियाच्या प्रथमदर्शनाने प्रत्येक माणूस दिपून जातो. मैलच्या मैल मुक्तमार्ग (फ्री वे) आणि त्यांच्या मध्यभागी बहरलेले फुलांचे ताटवे, त्यांच्यावर पाण्याचे शिडकावे करणारे स्प्रिंकलर्स, हिरवीगार गोल्फची मैदाने, बदाम, संत्री, मोसंबीच्या वनराया. सुबत्ता, मुबलकता आणि ऐश्वर्याची किनार. संपूर्ण राज्याला सुंदर समुद्रकिनारा लाभलेला सुवर्णमय (गोल्डन स्टेट) कॅलिफोर्निया! पंधरा-वीस इंच वार्षिक पाऊस पडला की सारे खूश! आणखी पाऊस पडून करायचे काय? हवाईचं काही कौतुक नाही. उंच, दाट झाडांचं घनदाट जंगल तर नकोच नको! हॉलीवूडचं रेड कार्पेट आणि गोल्फसाठी असलेली मनुष्यनिर्मित ग्रीन कार्पेट यामुळे सारेच मजेत! त्यामुळे चार-पाच वर्षांपूर्वी या राज्यात पाऊस कमी पडला तेव्हा आम्ही चक्क छत्र्याबित्र्या अडगळीत टाकल्या. आणि गव्हर्नरने सांगितलं- ‘पाणी जपून वापरा यंदा!’ तर सगळं हसण्यावारी नेलं! कोणी विचारलं तर थट्टेच्या स्वरात ‘अहो, आमच्याकडे कसली पाणीटंचाई? म्हणजे रोज गाडय़ा धूत असाल तर आता आठवडय़ातून चारदा धुवा फक्त!’ असं म्हणून उडवून लावलं जायचं. त्यानंतरच्या वर्षीही पाऊस कमी पडला तेव्हा पावसाची थट्टा सुरू केली. ‘अहो, कॅलिफोर्नियाचा पाऊस ना? धो-धो पडेल सांगतात तेव्हा उगाच झिरमिळतो. बोलूनचालून हे मूळचं वाळवंट! पाणी घालून घालून इथे हिरवे मळे बहरतात. पण क्या बात है! अहो, अख्ख्या देशाला बदाम पुरवतो आम्ही! आणि आमच्या संत्र्यांच्या झाडांना बहर येतो तेव्हा सबंध कॅलिफोर्निया घमघमतो.’  त्यामुळे पाऊस कमी झाला तरी लोक मजेत होते. फुलं बहरत होती. वणवे लागून जंगलं भस्मसात होत होती. फळांच्या बहराने फांद्या वाकत होत्या. धरणातील पाण्याची पातळी वेगानं कमी होत होती. एक-दोन ठिकाणचे ‘डिसॅलिनेशन प्लँटस्’- म्हणजे समुद्रजलापासून उपयुक्त पाणी तयार करण्याचे कारखाने छत्र्यांसारखेच दुर्लक्षित होते.

तीन वर्षे उलटून गेली. बातम्यांवरून कळू लागलं, की कॅलिफोर्नियात दुष्काळ पडतो आहे! चर्चा सुरू झाल्या. वर्तमानपत्रे रकाने भरू लागली. शास्त्रज्ञ, राजकारणी, अर्थतज्ज्ञ सर्वाच्या दुर्बिणी कॅलिफोर्नियाकडे वळल्या. कोणी तज्ज्ञ म्हणाले, ”कॅलिफोर्निया हे जगातलं सर्वात मोठं जिओ-इंजिनीयरिंग प्रोजेक्ट. पण त्यात एक जीवघेणी फट आहे. इथलं पाण्याचं चक्र कसं चालतं त्याची कल्पना कुणाला नाही. पाणी पडतं ते वाहून समुद्राला मिळतं. आता तुमची आशा आहे ती म्हणजे समुद्रच! तेव्हा उघडा ही डिसॅलिनेशन प्लँट्स. बांधा नवीन काही; नाहीतर आणखी काही वर्षांनी कॅलिफोर्निया कसा दिसेल? आता मंगळावरचा फोटो दिसतो तसा!”

गेल्या वर्षांपासूनच घराघरात या चर्चा पोहोचू लागल्या आणि नकळत पाण्याचे नळ सोडताना बारीक धार पडू लागली. नवी घरे बांधताना बाथरूममधल्या फ्लशमध्ये कपात करण्याची तंत्रे वापरली जाऊ लागली. हिरवळीला पाणी घालण्याचे स्प्रिंकलर्स बारीक होऊ लागले. ठिबक सिंचन- म्हणजे ड्रिप इरिगेशनचे तंत्र वापरले जाऊ लागले. सांडपाणी पुनर्वापराच्या तंत्रांचा विचार होऊ लागला. काही ठिकाणी नवी घरे बांधण्यावरच बंधने घातली गेली. प्रत्येकाने रोज लिटरभर पाणी वाचवलं तरी ३९ दशलक्ष लिटर पाण्याची बचत होते! काहींनी शॉवरसमोर घडय़ाळं लावून पाणी कमी कसे वापरावे, याचे प्रयोग करून पाहिले. रेस्टॉरंटमध्ये पाण्याचे मोठ्ठाले ग्लास भरले जात. आता विचारल्याशिवाय पाणी समोर येत नाही असेही काही ठिकाणी होऊ लागले. ‘चला, पाण्याऐवजी बीअर पिऊ,’ असा उपाय आमच्या एका शेजाऱ्याने सुचविल्याचे ऐकले. दुसऱ्या शेजाऱ्याने पाण्याचे पेले इतके छोटे केले, की त्यात एका वेळी घोटभरच पाणी मावते! आमच्या गृहसंकुलातले काही बहाद्दर सोसायटीच्या सार्वजनिक हमामखान्यात जाऊन स्नान करू लागले. म्हणजे आपल्या घरचं पाणी वाचवलं की झालं, हा सोयीस्कर विचार! ‘अहो, असं करून कॅलिफोर्नियातलं पाणी कसं वाचणार?’ असं म्हणणाऱ्या लोकांना ‘त्यापेक्षा तू न्यू जर्सीत जाऊन अंघोळ कर ना!’ असा सल्ला देऊन त्यांची खिल्ली उडवण्यात आली. एकंदरीत प्रत्येकाने आपापल्या परीने पाणीबचतीची जबाबदारी अंगावर घेऊन पाणीटंचाईवर उपाय सुरू केले.
दुष्काळ केवळ पाऊस कमी पडल्यामुळे येत नाही. नैसर्गिक आपत्ती आणि पाण्याच्या गैरव्यवस्थापनाची मानवी प्रवृत्ती यातून दुष्काळ उद्भवतो. दुष्काळाचे विश्लेषण प्रत्येकजण आपापल्या परीने करतो. हवामान खात्याचे तज्ज्ञ ओलेपणाचा अभाव आणि कोरडेपणा किती काळ राहतो याचा अभ्यास करून निष्कर्ष काढतात. शेतीतज्ज्ञांना पाण्याच्या कमतरतेने शेतीवर होणारे परिणाम, जमिनीवर होणारे परिणाम (मृद्संधारण, इ.), तलावांची घसरणारी पातळी दिसू लागते. अर्थतज्ज्ञांना शेतीचे नुकसान, त्यातून समृद्धीवर होणारे परिणाम असे गुंतागुंतीचे प्रश्न भेडसावू लागतात.

यावर्षीच्या प्रारंभीच गव्हर्नरने कॅलिफोर्निया हे दुष्काळी राज्य असल्याचे घोषित कले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यपातळीवर प्रयत्न सुरू झाले. पाण्याच्या वाहतुकीसाठी पाइप्स टाकणे, इस्रायलकडून डिसॅलिनेशन प्लँटची नवी तंत्रे शिकणे, नवीन प्लँट्स बांधणे आणि राज्यातल्या सुमारे ३९ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून पाण्याच्या कपातीचे आवाहन करणे, असे विविध मार्ग! १ जूनपासून राज्यात २५ % पाणीकपात जाहीर झाली. गावोगावी ग्रामसभा बोलावून लोकांना या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितले गेले. यात ‘स्पेसशिप अ‍ॅप्रोच’ आणि ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिग अ‍ॅप्रोच’ही आला. पृथ्वी (वा कॅलिफोर्निया म्हणा!) ही एक अवकाशयान समजा. अवकाशयानात तेच पाणी पुन:पुन: वापरण्याची तंत्रे असतात. तसे पाणी ‘रिसायकल’ करा, पावसाचे पाणी अडवा आणि त्याचा वापर करा- हा विचार म्हणजे अवकाशयान तंत्राने पाणीटंचाईच्या प्रश्नाला हात घालणे!

अमेरिकेत एखादा प्रश्न सोडवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात. जसे- प्रश्नांचा सर्वागीण अभ्यास, लोकांकडून, तज्ज्ञांकडून सूचना मागवणे, लोकशिक्षण, त्यासाठी प्रथम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.. नंतर सामुदायिकरीत्या प्रश्न सोडवण्यासाठी मदत आणि प्रशिक्षण दिलं जातं. आर्थिक सवलत जाहीर केली जाते. हे सर्व झाल्यावर नियम करून ते न पाळणाऱ्यांना साम-दाम- दंड.. अशा पायऱ्या. यात तसे नवीन काही नाही; पण अशाने कार्यक्षमता नक्की वाढते. लोक नियम पाळतात की नाही, हे पाहण्यासाठी दंडुकेशाही न वापरता लोकांच्या सवयी कशा बदलता येतील, हे पाहिले जाते.
आम्ही आवर्जून आमच्या गावच्या ग्रामसभेस गेलो होतो. सभेला खच्चून गर्दी होती. पाणी खात्याच्या प्रमुखांनी सुरुवात केली- ‘हे पाहा, पाणीकपातीचा नियम तुम्हाला कदाचित आवडला नसेल. मलाही तो आवडला नाही. पण सर्वानी तो पाळू या..’ अशा गोड शब्दांतल्या आवाहनाने सुरुवातीलाच त्यांनी सर्वाना आपलेसे केले. लोकांची सहानुभूती मिळवली. एक मात्र आहे- व्यक्तिश: एखादा कायदा मान्य नसला तरी तो पाळण्यासाठी स्वत:च स्वत:वर पहारा ठेवण्याची वृत्ती इथे बहुसंख्य लोकांमध्ये दिसते. मागे जेव्हा ‘ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी सिगरेट ओढायची नाही, धूम्रपानासाठी राखीव जागेत जाऊन ओढायची-‘ असा नियम गावात झाला तेव्हा तो फतवा आमची कंपनीप्रमुख

तोंडात सिगरेट धरून तो वाटत होती. तिला हा कायदा मान्य नव्हता, हे तिने न बोलता सांगितले. पण दुसऱ्या दिवसापासून तिने कामाच्या ठिकाणी सिगरेट ओढणे बंदही केले. हळूहळू सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आपोआप बंद झाले. लोकांना तशी सवय लागली. तर या पाण्याच्या ग्रामसभेतही लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन केले गेले. मग पाण्याच्या वापरासंबंधी सरकारी कार्यक्रमांची माहिती दिली गेली.
*कोणी घराभोवतीची हिरवळ कमी केली तर मदत.
*कोणी कमी पाणी वापरणारे कपडेधुवक- म्हणजे ‘वॉशर्स’ नवे घेतले तर सवलत.
* ‘हाय एफिशियन्सी टॉयलेट्स’ बसवण्यासाठी सवलत.
*पाण्याचा वापर कसा कार्यक्षम करावा यासाठी मोफत सल्ला देण्याची सोय.
ी नव्या स्प्रिंकलर्ससाठी योजना. प्रत्येकाला पहिले २५  स्प्रिंकलर्स मोफत.
*दुष्काळात तगणारी झाडे लावण्यासाठी मदत.
*पाण्याचा कमी वापर करणाऱ्यांना आयकर सवलत देण्याचा विचार.

पाणीपट्टीत वाढ.
*पाणी वाया घालवताना कोणी दिसले तर दिवसाला ५०० डॉलपर्यंत दंड!
या आणि अशा योजनांची माहिती सांगून घरी जाताना प्रत्येकाला एक पाण्याची बादली भेट दिली गेली.
अजूनही आमच्या राज्यात नळाचे पाणी २४ तास येते. ‘पाणी आले, पाणी गेले’ अशी धावाधाव नाही. बादल्या घेऊन रांगा नाहीत की टँकरची वाट पाहणे नाही. बदामाचे नि संत्र्याचे उत्पादन कमी न करता पाणीकपात कशी करावी, यावर विचार होतो. आम्ही तसे मजेत आहोत. पण ‘पाणी हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे’ असे म्हणताना आम्हा कॅलिफोर्नियाकरांना पाणीवापराच्या जबाबदारीची आता जाणीव झाली आहे.

विद्या हर्डीकर-सप्रे ( पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता )

अमेरिकन कोर्टाची पायरी

शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात! भारतात असताना कोर्टकचेरीचा प्रसंगच आला नसल्याने कोर्ट, वकील, आरोपी, साक्षीदार वगैरे शब्दसुद्धा अर्थापुरतेच माहिती! अमेरिकेत मात्र मला चार कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या. तेही मी वकील, जज्ज, साक्षीदार नसताना! मी नुकतीच अमेरिकेत

आले होते तेव्हा पोस्टानं एक पत्र आलं. त्यावर लिहिलं होतं, ‘समन्स!’ बापरे! ही काय भानगड? त्या समन्सवर ‘ते पाळलं नाही तर..’ अशा बऱ्याच धमक्या दिलेल्या होत्या. गुन्हेगारी केल्यासारख्या पडेलपणे मी पुढे वाचलं आणि समजलं- ‘ही ज्युरी डय़ुटी आहे. आणि ती अमेरिकन नागरिकांसाठी असते!’ मी तेव्हा अमेरिकन नागरिक नव्हते,

पण ही ‘ज्युरी डय़ुटी’ काय असते, ते समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्याच्या संकल्पनेतून या ‘ज्युरी डय़ुटी’चा जन्म झाला. न्यायाधीशाचा खटल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायद्याच्या चौकटीतला असतो. तर सर्वसामान्य माणूस खटल्याकडे जीवनाभिमुख चौकटीतून पाहतो. रोजच्या जगण्यात आपला दृष्टिकोन काय असतो? आपली मूल्यं कोणती? ज्याला ‘कॉमन सेन्स’ म्हणतात, त्या संवेदनेतून खटल्याचा विचार कसा व्हावा? हे सर्वसामान्य माणसाला दिसतं. थोडक्यात- खटला, आरोपी इ. बाबत सर्वसामान्य माणसाने दिलेला निर्णय.

आरोपी सुटला म्हणून तो जनतेच्या दृष्टीनं निर्दोष असेलच असं नाही. उलट, कोणी कायद्याच्या कचाटय़ात अडकला म्हणून तो दोषी असेल असंही नाही. या दोहोंच्या चष्म्यातून आरोपीकडे पाहावे व शिक्षा ठरवावी, यासाठी हा ‘पंच’ किंवा ज्युरी मंडळाचा वापर जगातल्या अनेक न्यायसंस्थांनी सुरू केला. भारतातही ब्रिटिश राजवटीत न्यायालयाने ज्युरीचा वापर केला होता. पुढे हा प्रकार भारतातून नाहीसा झाला.
अमेरिकेतील न्यायदानात प्रत्येकाला ‘ज्युरी’ची मदत घेण्याचा हक्क घटनेने दिला आहे. आरोपीला दोषी अथवा निदरेष ठरवण्याचे, दोषी आरोपीला शिक्षा किती द्यावी, हे ठरविण्याचे किंवा खटल्यात नक्की काय घडले, हे शोधून तो तपशील कोर्टाला पुरवण्याचे असे तीन वेगळ्या स्तरांवरचे काम ज्युरी मंडळाला करावे लागते. तुम्ही १८ वर्षांच्या वरचे अमेरिकन नागरिक असाल आणि इंग्रजी समजत असले की झाले! अमेरिकेत बहुसंख्य खटले ज्युरी मंडळाच्या मदतीने चालतात. फारच थोडे ज्युरीविना म्हणजे ‘बेंच ट्रायल’ पद्धतीने चालतात. आता एवढी प्रचंड (?) माहिती मिळवल्यावर ज्युरी डय़ुटीचं ‘समन्स’ पाहून मी “‘वा! आपण फार महत्त्वाचे अमेरिकन नागरिक आहोत! आणि सरकारने फारच महत्त्वाची जबाबदारी दिली तर ती चोख पूर्ण करावी,’ “या उत्साहाने मी ऑफिसात साहेबासमोर ‘समन्स’ नाचवले. त्याने नाक मुरडलं- ‘हं! म्हणजे तू आठ दिवस तरी कामाला दांडी मारणार आणि तुझं काम मला करावं लागणार. वर पुन्हा तुला पगार द्यायचा! तू असं कर- मी देतो ते पत्र त्यांना पाठव, म्हणजे तुझी सुटका होईल.’ आणि मग ‘हिच्यावाचून कंपनीचं काम अडतं..’ वगैरे त्यानं लिहून दिलं. ऑफिसातले बाकीचे काम करणारेही ‘ज्युरी डय़ुटी कशी टाळावी?’

यावर माझं बौद्धिक घेऊ लागले. ‘अगं, तिथे अडाणी माणसांना घेतात!’ ‘तुझ्यासारख्या डिग्रीवाल्यांचं हे काम नाही. तिथं ‘होमलेस’ वगैरे माणसं येतात व दिवसाला पाच डॉलरचा सरकारी भत्ता घेऊन जातात!’ ‘सरळ सांग त्यांना, की मी तेव्हा गावाला जाणारेय, तेव्हा ही डय़ुटी करायला मला वेळ नाही!’ ‘नाहीतर सरळ सिक लिव्ह मार!’ (वा! म्हणजे  तुम्हीही अशी ऑफिसला दांडी मारता वाटतं? मला वाटलं होतं, अमेरिकन लोक भारतीयांपेक्षा जास्त प्रामाणिक असतात!)
तीन-चार ‘समन्स’ या ना त्या कारणाने मी यशस्वीपणे परतवली. मग गावातल्या छोटय़ा कोर्टाचं एक दिवसाच्या ज्युरी डय़ुटीचं एक समन्स आलं. ‘अगं, जा ना. कळेल तरी काय गंमत असते! मला ज्युरी डय़ुटी करायची आहे, पण समन्सच येत नाही!’ अशा नवऱ्याच्या आग्रहखातर मी कोर्टात गेले.
एका खोलीत ज्युरी उमेदवारांना कोंबून ठेवलं होतं. एक बाई कोणालाही न कळेल अशा उच्चारात रूक्षपणे सूचना देत होती. जरब अशी, की आपण चुकून गुन्हेगारांच्या खोलीत तर नाही ना आलो, असं सर्वाना वाटावं! इथे दिवसभर थांबायचं तर ‘लघुशंका’ आली तर जाऊ देतात की नाही, या शंकेनंच मला ‘जावंसं’ वाटू लागलं.

आम्हाला गडबड करायला परवानगी नव्हती. चूपचाप आपलं काम, वाचन करत बसायचं. मधूनमधून पुकारा येई. पाच-दहा नावं पुकारत. ‘हाजीर है!’सारखं ‘येस!’ म्हणत पाच-दहा मेंढरं आत जात. ‘त्यांचं काय होणार आत?’ अशी मला उगाचच भीती! जणू काही जज्ज नामे सिंह त्यांना खाऊनच टाकणार! मी चुळबुळत बसलेली. दुपारी १२ ते १ जेवायला ‘सोडलं.’ एकला पाच मिनिटं असताना सर्वानी आलंच पाहिजे- असं फर्मान! मग सर्वाची पुन्हा हजेरी!
तीनच्या सुमाराला आम्हाला सांगितलं गेलं की, ‘तुमची डय़ुटी पूर्ण झाली. घरी जा. जाताना पलीकडल्या खिडकीतून पाच डॉलरचा दिवसाचा भत्ता घेऊन जा!’ त्या काळी अमेरिकेतलं किमान वेतन तासाला पाच डॉलर असताना मला आठ तासांचे फक्त पाच डॉलर्स असं नगण्य वेतन सरकारकडूनच मिळालं. अशा तऱ्हेने पहिल्या ज्युरी डय़ुटीवर शिक्का बसला.
दुसरी ज्युरी डय़ुटी आली काऊंटीच्या कोर्टात! एका मुलीने शॉपिंग मॉलमधल्या एका प्रख्यात दुकानातून ‘शॉप लिफ्टिंग’ केलं होतं. थोडक्यात, ती चोरीची आरोपी होती. यावेळी बोलावलेल्या ५०-६० लोकांना एकदम कोर्टरूममध्येच खेचण्यात आलं. न्यायाधीशानं ठोकठोक करून सर्वाना चूप बसवलं. तंबी दिली- ‘याद राखा.. काही करून बाहेर पडायचा प्रयत्न केलात तर! इथून बाहेर पडलेल्यांना दुसऱ्या कोर्टरूममध्ये हजर राहावं लागेल. ही केस मी एका दिवसात उडवणार आहे! बाकीच्या रूममध्ये सगळ्या आठ-दहा दिवसांच्या केसेस आहेत!’

मग त्यांनी केस समजावून सांगितली. ‘कोणी चोरी केली असेल (म्हणजे कोणावर केस झाली असेल) तर त्यांना ज्युरी होता येणार नाही. त्यांनी बाहेर पडावे. कोणी पूर्वी या दुकानात किंवा त्यांच्या कंपनीत काम केलेलं असेल तर त्यांनाही ज्युरी होता येणार नाही..’  न्यायाधीश महाराज यादी वाचत होते. अर्थात खऱ्या-खोटय़ाची शहानिशा केल्याशिवाय सोडत नव्हतेच. म्हणजे तशी सुटका नव्हतीच! या केसवर काम करून एका दिवसात कोर्टाचा अनुभव, सुटका (आणि भत्ता!) असा एका दगडात थवा मारावा असा विचार होता. पण मी पूर्वी त्या कंपनीत काम केलं होतं. म्हणजे मी या ज्युरी डय़ुटीसाठी योग्य नव्हते. आता ‘खरं सांगू नये नि खोटं बोलू नये’ अशा कात्रीत माझी बाकबूक सुरू झाली. एव्हाना ५० पैकी बाकीचे निघून गेले होते. आम्ही पाचजण शिल्लक होतो. तेव्हा मी सरळ गुपचूप राहायचं ठरवलं. (न्यायाधीशालाही सटकायचं होतं!)
केस सुरू झाली. ती पोरगी निर्ढावलेली होती. पूर्वी चार वेळा तिला चोरीवरून शिक्षा झालेली! शिवाय आम्हाला चार-पाच वेळा तिच्या ‘शॉप लिफ्टिंग’चा रंगेहाथ पुरावा म्हणून व्हिडीओ दाखवण्यात आला. (आता एवढा सबळ पुरावा असताना हा कोर्टरूम ड्रामा कशाला, असा प्रश्न मला पडला.) दोन्ही बाजूंचे वकील क्लिष्ट अशा कायद्यांचा कीस काढत होते. मला पेंग येऊ लागली. पण तरी मी सगळं आज्ञाधारकपणे आणि कर्तव्यभावाने ऐकत होते. दोन तासांनी ‘ठकठक’ करत न्यायाधीश महाराजांनी आज्ञा दिली- ‘आता ज्युरी मंडळानं चर्चा करावी आणि निर्णय घेऊन बाहेर यावं!’

माझा निर्णय झालेला होता. ‘स्वच्छ पुरावा होता. तेव्हा आरोपी दोषी!’ पण अन्य पाचजणांची चर्चा सुरू झाली. एकाच घटनेकडे प्रत्येकजण कसं निरनिराळ्या नजरेनं पाहतो याची ती झलक होती. आरोपीचं वय, वर्ण, तिची उत्तरं द्यायची पद्धत, तिचे शब्द.. एक ना दोन, अनेक बाजूंनी उलटसुलट चर्चा! तो व्हिडीओ त्याच स्टोअरचा की पूर्वीच्या चोरीचा, हा मुद्दा कोणीतरी काढला. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण निदरेष माणसाला शिक्षा होता कामा नये, हा मुद्दाही चर्चेत आला. ज्युरी मंडळाचे सर्व सदस्य आपली ‘डय़ुटी’ अतिशय गंभीरपणे बजावत होते. माझ्यातला सक्षम, कर्तव्यदक्ष ‘ज्युरी’ जागा झाला. ही कोणाला तुरुंगात धाडण्याची केस आहे. आमच्या सहीच्या फटक्यानिशी एका माणसाचं भविष्य बदलणार आहे! (मग ते एका दिवसाचं का असेना!) चांगली दोन तास चर्चा करून, तीन वेळा व्हिडीओ पाहून खात्री केल्यावरच आमचं एकमत झालं. ‘ज्युरी डय़ुटी’चा अर्थ मला तेव्हा खरा समजला!
मला तिसरी ज्युरी डय़ुटी आली ती एका मोठय़ा कोर्टात! ज्युरी निवड कशी चालते, याची कल्पना असल्यानं मी जरा बिनधास्तच होते. माझी पहिल्या फेरीत निवड झाली. पुन्हा ५० जण कोर्टरूममध्ये! समोर आलेली केस खुनाची होती! बापरे! हादरायलाच झालं! न्यायाधीश महाराज एकेकाला प्रश्न विचारून पास-नापास करून निवडत होते. आरोपी समोर बेडरपणे आमच्याकडे पाहत होता. मला मनातल्या मनात चळाचळ कापायला होत होतं. ‘देवा, मला नापास कर..’ अशी मी मनातल्या मनात प्रार्थना करत होते.

यायाधीश महाराजांनी काय विचारलं नि मी काय बोलले, देवास ठाऊक! पण तिसऱ्या प्रश्नाला ‘खून करणं हे पाप आहे!’ असं उत्तर मला सुचलं. माझी तातडीने बाहेर रवानगी करण्यात आली. नंतर दोन रात्री मला झोप लागली नाही. हा माणूस खुनी असला आणि आरोपातून सुटला तर आपल्या मागे लागेल असं वाटत राहिलं.
काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा मला डय़ुटीचं समन्स आलं. पुन्हा कोर्टाची पायरी चढले. हे न्यायाधीश महाराज अजबच! त्यांनी ४५ मिनिटांचा इतिहासाचा तास घेऊन अमेरिका, अमेरिकन नागरिक, सैनिक, युद्धे, त्यांनी देशासाठी केलेला त्याग असं बरंच सुनावून आपल्या देशासाठी ज्युरी डय़ुटी करणं हे कसं महत्त्वाचं आहे, हे पटवून दिलं. मी आज्ञाधारकपणे ज्युरी डय़ुटी करावी म्हटलं. पण तेवढय़ात मला परिणामकारक उत्तर सुचलं, ‘मी सेल्फ एम्प्लॉइड असून डय़ुटी केली तर उत्पन्न बुडेल व माझा पोटापाण्याचा प्रश्न येईल, तेव्हा मायबाप सरकारने तो सोडवावा. मी जन्मभर रोज कोर्टात येईन. कोर्टाचा दिवसाचा १५ डॉलरचा भत्ता ( आता वाढला आहे) मला पुरत नाही!’
माझं उत्तर ऐकून न्यायाधीश महाराजांनी विचारलं, ‘काय आहे तुझा पोटापाण्याचा व्यवसाय?’ मी उत्तरले, ‘मी आठवडय़ातून एक तास योगासनांचे वर्ग चालवते!’  मास्तराने अभ्यासाचं महत्त्व सांगणारं तासभर लेक्चर देऊनही एखाद्या पोरानं ‘सर, मी अभ्यास नाही केला. कारण माझ्या पापणीचा केस दुखत होता,’ म्हणावं, तसं हे माझं उत्तर ऐकून न्यायाधीश महाराज स्तब्धच झाले. पुढच्या क्षणी त्यांनी पुकारा केला- “excused! go home!” 
 -विद्या हर्डीकर-सप्रे, कॅलिफोर्निया     

( पूर्व   प्रसिद्धी: लोकसत्ता)