अमेरिकन नाती गोती

माझ्या अमेरिकन शेजारणी दुपारी चहाला आल्या होत्या. जगभरच्या सर्वच बायकांचा जिव्हाळय़ाचा एक विषय असतो- ‘सासूू’ (म्हणजे विषय जिव्हाळय़ाचा, ‘सासू’ नव्हे!) माझी शेजारीण ‘सू’ (सू- म्हणजे सूझान) म्हणाली, ‘I told my husband the other day! I said, ‘You know , I would be very upset if you bury me next to your mom!’

मी तर ऐकून अवाक् च झाले! एकंदरीतच अमेरिकन नातीगोती मला कोडय़ात टाकतात. इथे विद्यार्थिदशेत असताना एका अमेरिकन कुटुंबात मी राहत होते. तिथे त्यांच्या नातेसंबंधांचं दर्शन मला जरा जवळून झालं! विद्यापीठाजवळच बेवर्ली आणि फ्रँक स्टॅन यांचं चार-पाच खोल्यांचं घर. घरात ते दोघेच. ‘खोली भाडय़ानं घ्या आणि स्वयंपाकघर आमचं वापरा.’ अशी योजना होती. पहिल्याच दिवशी ‘बेव’नं बजावलं, ‘फ्रीजचा हा कप्पा तुझा. माझ्या कप्प्यातलं गाजर समजा घेतलंस, तर त्या बदली दुसरं गाजर दुसऱ्यादिवसापर्यंत आणून ठेवलं पाहिजे!’ आता एका घरात माणसं राहणार म्हणजे एवढा काटेकोर औपचारिकपणा कसा सांभाळणार, हा मला पडलेला प्रश्न! मी सहजपणे म्हटलं, ‘बरं! पण माझ्या कप्प्यातला एखादा पदार्थ तुला चव घेऊन पाहावासा वाटला तर माझी काही हरकत नाही हं! उष्टय़ा हाताचे बोट त्यात बुडवू नकोस म्हणजे झालं!’
एका घरात राहायचं तर टेबलावर ‘आपापलं’ खायचं, हे मला कसंतरीच वाटे. म्हणून मी आग्रहानं माझी मटकी उसळ (‘टेस्टी नटी स्टफ’) इडली (तिच्या मते ‘कार्डबोर्ड स्टफ’) (फ्रँक आणि बेवला खाऊ घाली. मग हळूहळू दोघं जरा अघळपघळ झाली! ‘तुझ्या घरात कोण? माझ्या घरात कोण?’ अशा गप्पा वगैरे सुरू झाल्या. एक दिवस फ्रँकचा भाऊ आला. दुपारी जेवला. परत निघाला! गप्पाबिप्पा औपचारिकच! ”हा राहणार नाही?” माझा भारतीय प्रश्न! ”हो. राहणार ना, दोन दिवस. पलीकडल्या रस्त्यावर हॉटेल आहे, तिथे उतरला आहे!” सख्खा भाऊ आलेला तो हॉटेलमध्ये उतरतो, हे मला अजबच वाटलं!
बेवची आई गंभीर आजारी झाल्याचा फोन आला तेव्हा मी तासाला निघाले होते! पण बेवनं हे सांगितलं आणि मी तिच्या काळजीनं तास बुडवला आणि तिच्याजवळ म्हणून थांबले! ”अगं, आधी विमानाचं तिकीट काढ. बॅग भरायला मदत करते मी तोपर्यंत!” असं म्हणत माझी लगबग चालू होती! ”विमान कशाला? महाग पडेल. मी ट्रेननं जाते. मला स्टेशनवर तेवढं सोड!” इति बेव! मी अवाक्! ‘विमान घेतलं तर आईची भेट तरी होईल! ट्रेननं ११ तास लागतात! आणि आई आजारी असताना पैशाचा कसला हिशेब!’ एवढं बेवर्लीला ऐकवण्याचा ‘प्रेमळ’ हक्क मी एव्हाना मिळवला होता!


शेवट ती ट्रेन घेऊन गेली, पण आईची तिची भेट काही झाली नाही. याची हळहळ मलाच!

”माझी वहिनी इथल्या विद्यापीठात संशोधन करायला येणार आहे एक वर्षांसाठी!” एक दिवस मी आनंदानं बेवर्लीला ऐकवलं! ”वहिनी?- तुला कोण भावंडं वगैरे? विचारलं तेव्हा म्हणालीस, ”फक्त बहिणी आहेत. मग ही वहिनी कोण?” बेवर्लीचा प्रश्न! ”म्हणजे काय? माझ्या चुलत भावाची बायको!” माझं उत्तर! ”मग ती तुझी वहिनी नाही!” असं बेवर्लीचं ठाम उत्तर!
अमेरिकन नात्यात चुलत भावंडं असतात, पण त्यांच्या बायका किंवा नवरे आपले कोणीही नसतात!
भाचे, भाच्या असतात, पण नवऱ्याचे वेगळे आणि बायकोचे वेगळे! ..असे धडे मला हळूहळू मिळत होते!

मग ‘थँक्स गिव्हिंग’चा सण आला. या सणाला अमेरिकी लोकांचा कौटुंबिक मेळावा होतो आणि मुलं, नातवंडं मुद्दाम घरी येतात. अर्थात अमेरिकी कुटुंब म्हणजे नवरा, बायको आणि मुलं, नातवंडं! अन्य नातेवाईक त्यात येत नाहीत. मित्रही नाहीत! स्वाभाविकपणेच मी बेवर्लीला म्हणाले, ”अगं, मी चार दिवस माझ्या (‘माझ्या’वर जोर) वहिनीला भेटायला जाते मग!”
बेवर्ली म्हणाली, ”वा! वा! असं कसं? तू आता ‘घरची’ आहेस. तेव्हा तू ‘थँक्स गिव्हिंग’च्या सणाला घरीच थांबायचं!” मी चकितच झाले! पण छान वाटलं मला!
मग फ्रँक ‘रुटॅन’- त्याची बायको म्हणून ती ‘रुटीन’, त्यांची मुलं (त्याची की तिची, या प्रश्नात मी पडले नाही.) म्हणून आमच्या संगणकीय परिभाषेत लोकल सब रुटीन्स आणि मी चौथं ‘ग्लोबल सबरुटिन’ अशी आमची सणासुदीला पंगत छान रंगली!
बेव आणि फ्रँक म्हणजे रुटॅन आणि रुटीन नंतर एकदा गावाला निघाले. मी म्हटलं, ”काळजी करू नका. मी घर सांभाळीन.” बेव म्हणाली, ”चालेल. मी तुला रोजचे दोन डॉलर्स देईन बिदागी म्हणून. मांजराला खायला घालण्याचा एक आणि संध्याकाळी बाहेरचा दिवा लावण्याचा एक” ”हं?” मी पुन्हा एकदा बुचकळय़ात! मला ही ‘घरची’ म्हणते (माझी मटकीची उसळ हक्कानं फस्त करते!) आणि मांजराला खायला घालण्याचे पैसे कसले देते? आता मी घरात आहे म्हटल्यावर मांजराचं पण करणार नाही का?..

माझं शिक्षण संपलं. मी भाडय़ाची ती खोली सोडली. पण नंतरही ‘रुटॅन’ कुटुंबाशी माझा संवाद सुरूच राहिला. नाताळमध्ये एकमेकांना भेटवस्तू देणे, ‘थँक्स गिव्हिंग’च्या सणाला मी (नंतर नवऱ्यासकट!) ‘रुटॅन’कडे जेवायला जाणे, भेटकार्ड,, वाढदिवसाला फोन.. सगळं!
गेल्या वर्षी फ्रँक बराच आजारी होता, म्हणून आम्ही दोघं मुद्दाम त्यांना भेटायला गेलो! घर अजून तस्संच होतं! दोघं मात्र खूप थकलेले! ”तुझी खोली अजून तुझीच आहे! तश्शीच ठेवली आहे! आज रात्री तुम्ही तुझ्या खोलीतच राहा!” बेवर्लीनं आग्रहानं सांगितलं. आम्हीही हक्कानं राहिलो!
गप्पांच्या ओघात उरलेल्या ‘सब रुटिन्स’ची चौकशी केली. ‘मुलं आपापल्या कुटुंबात गुंतली आहेत. एलिनं एकदा सुट्टी घेतली आठ दिवस. कुरकुरत का होईना, आली मदतीला! बिल आणि एडवर्ड फिरकलेली नाहीत! मधून मधून फोन करून बाबाच्या तब्येतीची चौकशी करतात! भेटायला धावत आलीस ती तूच आणि तुझा नवरा! बेवर्लीच्या डोळय़ांत पाणी होतं!
मला पुन्हा एकदा प्रश्न पडला, ”माझं नि रुटॅन्सचं नातं काय?” 

विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्रकाशन : लोकसत्ता , लोकरंग 23 मार्च 2015)

अमेरिकन शेतकरी

2015 च्या आसपासचे वर्ष. . कॅलिफोर्नियातील एका महामार्गावरून आमची गाडी पळत होती . दुतर्फा “पळती झाडे पाहूया “ अशी बदाम, पिस्ते आणि   फळ झाडे. पण काही भागात मात्र बने च्या बने वाळून पिवळी झालेली! विषण्णा करणारे दृश्य होते.

कॅलिफोर्नियातील दुष्काळाचे  ते दृश्य स्वरूप. पाण्याचा दर परवडो  की न परवडो ; पाणी बंद करून झाडांना मारणे अपरिहार्य झाले होते.   वर्षानुवर्षे मशागत करून जगवलेली आणि सोन्यासारखं पीक देणारी ती बने  मारताना शेतकऱ्याना काय वाटले असेल ?

भारतातील सुके, ओले   आणि कृत्रिम असे सर्व प्रकारचे दुष्काळ; पाणी वाटप प्रश्न; सरकारी मदत; शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा उहापोह;   शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मदतीचे हात, संस्थाचे आणि मदतीचे राजकारण …. असे अनेक विषय डोक्यात येऊन गेले आणि आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिकन शेतकऱ्यांबद्दल कुतूहल निर्माण झालं.  

.

“अमेरिकन शेतकऱ्यांपैकी जवळ जवळ प्रत्येकाकडे शेकडो एकर जमिनी असतात.  आधुनिक यंत्र आणि तंत्रे असतात! समृद्ध देशातील सर्व सुविधा हात जोडून उभ्या असतात.  आणि शिवाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी सवलतींची रेलचेल तर असणारच! तेव्हा समृद्ध अमेरिकेतील शेतकरीसुद्धा समृद्ध असणार.  त्याला कसली चिंता?” असा एक गैरसमज असतो.

   “ अमेरिकेतील शेती म्हणजे सरकारी अंदाजपत्रकातील लठ्ठ गाय “अशी माझीच काय पण अनेक अमेरिकन लोकांचीही समजूत असते.  या समजुतीला धक्का देणारी एक माहिती समजली. ती म्हणजे, अमेरिकेतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणाचे स्थान  प्रमाण एकूण आत्महत्यांच्या प्रमाणात सर्वात वरच्या स्थानावर आहे.

दर शंभर हजार शेतकऱ्या तील सुमारे 85 शेतकरी शेतीच्या चिंतेने आत्महत्या करतात!

कोणत्याही व्यवसायातील माणसाला असहाय वाटणारा तणाव (स्ट्रेस) आला  तर आत्महत्येचे विचार डोकावून शकतात. “आत्महत्येच्या सात एक कारणातील एक कारण म्हणजे तणाव आणि चिंता”,  असे तज्ञ सांगतात आत्महत्या हा मदतीसाठी केलेला एक प्रकारचा आक्रोश असतो पण मदत कशी मिळवता येईल हे समजल्यामुळे हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला जातो.  त्या दृष्टिकोनातून पाहिले तर कोणत्याही व्यवसायातील कोणीही माणूस या मार्गाने जाऊ शकतो. मग तो जगातील कोणत्या का देशाचा असेना! .

त्याच प्रमाणे चिंतातूर होण्याची काही कारणे जगातल्या कोणत्याही शेतकऱ्याला लागू पडू शकतात.

उदारणार्थ: १.  उत्पन्नापेक्षा खर्च जास्त म्हणून कर्जबाजारी होणे

                २ . कर्जापायी किंवा अन्य कारणांमुळे जमीन हातची जाणे.

शेतकऱ्याचं   स्वत्व म्हणजे जमीन.  तीच सरकली पायाखालून तर काय उरणार ? शून्य.  कारण शेतकऱ्याची जमिनीशी भावनिक बांधिलकी (म्हणजे emotional attachment)  असते.

स्वत्व गेलं, उत्पन्न गेलं  आणि अन्य कोणतीच अर्थार्जनाची कौशल्य नाहीत . अशावेळी कर्जाच ओझ वाटू शकतं  तस जगण्याचां ओझ वाटू शकतं..

अर्थातच अमेरिकन शेतकरी सुद्धा  या समस्यांना सामोरे जात असतात. एवढेच नव्हे , तर   शेती व्यवसायात आत्महत्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.  

त्याची काही कारण मीमांसा करता येते.

उदाहरणार्थ अमेरिकन शेतकऱ्यांकडे  जमीन बरीच असली तरी पैसे बरेच मिळतात असे नाही.  कारण जमिनीच्या प्रमाणात अवजारे, बी बियाणे, जंतुनाशके  हे सर्व लागते. त्यासाठी लागणारे कर्जही मोठे असते.

सरकारी दराच कर्जाचे दर वाढतच असतात त्यामुळे तोही चिंतेचा विषय. कधी उत्पादन अपेक्षेपेक्षा  कमी येते.

कधी उत्पादनासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा विक्रीचा दर  कमी मिळतो. तो ठरवणे अर्थात शेतकऱ्याच्या हातात नसते. त्यामुळे  उत्पन्नात घट होते

शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असतात ते  हवामानात होणारे पराकोटीचे बदल. पृथ्वीचे वाढते तपमान म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हे एक कारण.   इतर नैसर्गिक आपत्तीही उत्पादनावर अक्षरशः पाणी फिरवू शकतात. त्यामुळे अर्थातच उत्पादन घटते.   अशा घटनांचे अंदाज येत नाहीत म्हणून त्यासाठी तरतुदी आणि योजना करता येत नाही.

अमेरिकेतील आरोग्य सेवा प्रचंड महाग असते.  ती खेड्यात उपलब्धही नसते. त्यामुळे तो खर्च हाताबाहेर जाऊ शकतो.  व्यक्तिगत आरोग्य विमा खूप महाग असतो. कंपनीत काम करणाऱ्या लोकांना हा  विमा स्वस्त दरात मिळतो. त्यामुळे जवळजवळ 75% शेतकरी शेतीच्या बरोबरच . दुय्यम नोकऱ्या शोधतात म्हणजे बिगर शेती उत्पन्नावर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करतात.

कुटुंबातील सगळेच  लोक शेती करतात; म्हणजे त्यांना फक्त शेतीवरच अवलंवबून रहावे लागते.  

20१3 पासून शेती उत्पन्नात  सातत्याने घट होत आहे. 20१३ चे उत्पन्न आज १०१८ मध्ये ३५ % घसरले आहे.  

त्यातून सध्या गाजत असलेल्या आयात करामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये दुहेरी भर पडली आहे.  उदाहरणार्थ अमेरिकेने आयात मालावर कर बसवल्याने अवजारे महाग झाली आहेत तर सोयाबीनवर चीनने कर लादल्यामुळे सोयाबीन पिकवून चीनला निर्यात करणारे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत असे प्रश्न अंगावर येऊ लागले की  काही शेतकरी दिवाळखोरी जाहीर करतात. त्या कायदेशीर प्रक्रियेत त्यांची सर्व जमीन सरकार जमा होते.

शेकडे एकर जमीन असलेला शेतकरी भूमिहीन होतो.

1920 च्या सुमाराला आर्थिक मंदीचे संकट होते त्यावेळी आणि  1980 मध्ये शेती प्रश्न इतके गंभीर झाले की शेतकरी निराश होऊ लागले आणि  त्यावेळी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असे आकडेवारी सांगते

आत्महत्या रोखण्यासाठी काही सरकारी प्रयत्न असतात.  तसेच काही संस्थांनी ‘समुपदेशन दूरध्वनी सेवा’ म्हणजे फोन हॉट लाइन सुरू केल्या आहेत.  त्या काही काळ चालतात पण सरकारकडून पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने बंद पडतात. उदाहरणार्थ 2000साली  डॉ. रोजमन या कार्यकर्त्या समुपदेशकाने “sowing the seeds of hope” या नावाची एक मोहीम सुरू केली. त्या मोहिमेचा भाग म्हणून  सात राज्यात मानसिक आरोग्य सेवा देणारे जाळे विणले त्यात समुपदेशन दूरध्वनी सेवा सुरू केल्या. आर्थिक समस्या आणि कोर्टकचेऱ्या यासारखी मूलभूत कारणे शोधून काढून त्यावर घाव घातले की तणाव हा नियंत्रित करता येतो.  परिणामी आत्मघाताने होणारी जीवित हानी कमी करता येते., हे डॉ. रोजमन यांचे म्हणणे. त्यांच्या मोहिमेला चांगले यश आलेही.

परंतु तो कार्यक्रम 2014 मध्ये पैशाअभावी बंद करावा लागला

रोजमनसारख्या अनुभवी मानसशास्त्रद्न्यचे निरीक्षण असे की शेतकऱयांची केवळ  भूमीशी निष्ठा एवढेच नाही तर , ते अन्न आणि वस्त्र निर्मितीचे कामही समर्पित भावनेने करत असतात. अशी मानसिक गुंतवणूक असल्यामुळे  

यातून  पैसे मिळवणे त्यांना अशक्य होते तेव्हा ते मानसिक दृष्ट्या कमकुवत होतात.

तात्पर्य काय तर देश गरीब असो की श्रीमंत ! शेतकऱ्यांचा प्रश्न जगभर असतो.  वातावरणातील बदला (ग्लोबल वॉर्मिंग आलेच) मुळे हा प्रश्न दिवसेदिवस तीव्र होण्याची शक्यता वाढतच आहे !

———–विद्या हर्डीकर सप्रे

( पूर्व प्रकाशन : महाराष्ट्र टाइम्स , जुलै २०१८)

केक,आय लव्ह यू !

सांडिएगो शहरातील अगदी भर मध्यावरील ‘पल्स’ या मेरियाट हॉटेलच्या बाराव्या मजल्यावरील खिडकीतून समोर कोरोनाडोचा दिमाखदार पूल दिसतो आहे. समुद्राच्या निळसर चकाकीचा लहान तुकडा देखील ! माझ्यासमोर कॉफीचा वाफाळता कप आणि नुकत्याच आणलेल्या सुंदर केकचा कलापूर्ण कप !……

    तासाभरापूर्वीच आम्ही या केकच्या कलावंत कृती बद्दल, केककर्तीशी गप्पा मारत होतो ! जिल ‘ओ’ कॉर्नर असे तिचे नांव !

    त्याच असं झालं की, ‘कोरोनाडो’ भागा मधील दहाव्या रस्त्याच्या एका कोपऱ्यावर एक पाटी दिसली, “केकची चव चाखा आणि पुस्तकावर केककृतीची सही घ्या – सर्वाना निमंत्रण आणि मुक्त प्रवेश …

     ‘कोरोनाडो’ हे सॅडियागो शहराच्या कुशीतले एक चिमुकले बेट ! निसर्गरम्य, निळ्या सागराने किनारलेले टुमदार घरांची वस्ती आणि पिटुकल्या बागा असलेले ! म्हणजे जणू सर्व वाद्यवृंद तयार होऊन आता प्रेक्षकांसाठी स्वरमेळाचा कार्यक्रम करणार असं वातावरण !

‘टुरिस्टां’ साठी जबरदस्त आकर्षक ‘पर्यटना’ चे मुक्त प्रवेशद्वार !

    सॅडियोगातून हा पूल बांधल्यामुळे प्रवाशांना दहा मिनिटात कोरोनाडोवर जाता येते. ‘कोरोनाडो हॉटेल’ सारखे ऐतिहासिक स्थळ, कोरोनाडोचा इतिहास सांगणारे विनामूल्य प्रदर्शन, अत्याधुनिक सार्वजनिक ग्रंथालय, हर प्रकारच्या वस्तूंची सुबक ठेंगणी दुकाने, सायकलस्वारांसाठी मार्ग, किनारपट्टीवर सर्फिंग, पोहोणे, बोटींगची करमणूक – आणि नानापरीच्या खाद्य पेयांनी सुसज्ज रस्ते – यात प्रवाशांना आणखी खूष करण्यास उन्हाळ्यात बसची विनामूल्य सरकारी सेवा ! आज सकाळपासूनच आम्ही तिकडे बागडत होतो. समुद्रदर्शक खिडकीतून बाहेर पहात दुपारचे सुग्रास जेवण झाल्यावर आम्ही विनामूल्य बसची वाट पाहण्यापेक्षा चालत चालत हे बेट पहावे असे ठरवून डुलत डुलत निघालो ! रस्ता निवांत होता. म्हणजे कॉफीचं दुकानं शोधायचं तर अर्धा मैल चालावं लागेल असं मनाशी म्हणत असतांना एका कोपऱ्यावर ही “केक” चाखण्याची अभिनव पाटी दिसली ! होती एका कलात्मक केशकर्तनालयाच्या दारात ! जरा बिचकत आत गेलो. एका कोपऱ्यात कलात्मक केकचे प्रकार मांडून केकच्या चित्रांचे एप्रन घातलेल्या प्रसन्न मुली केकचे नमुने दाखवून विचारत होत्या “कोणता हवा ?”

    दुसऱ्या कोपऱ्यात टेबलावर “ केक आय लव्ह यू” या नावाच्या पुस्तकाच्या प्रती आणि प्रेमळ अगत्यशील ‘जिल’ पुस्तक दाखवत होती. कोणी विकत घेतले तर स्वाक्षरी करून देत होती ! केकचा समाचार घेऊन मी तिला ‘केक’ सुंदर झाल्याची दिलखुलास पावती दिली! “मी सर्वेक्षण म्हणून विचारते, “या तीन प्रकारातला कोणता जास्त आवडला आणि का? “ तिने माझ्याशी संभाषणाला सुरवात केली. मी वाईनरीच्या गावातली – त्यामुळे ‘वाईन टेस्टिंग’ हा प्रकार मला माहिती. सुवास, स्वाद, जिभेच्या विविध भागांना जाणवलेल्या चवींचे पदर, नंतर रेंगाळणारा सुवास आणि चव…. इ. प्रकारे या ‘टेस्टिंग’ बद्दल बोलता येणे हा. ‘टेस्टिंग तज्ञतेचा मापक असतो अस्सा ‘सा’ लागला. मापकाच्या आधारे मी ठोकून दिले,” ‘मला ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीच्या फळांनी सजवलेला केक आवडला, खातांना ब्लूबेरीच्या मंद चवीची गाज जाणवत होती आणि नंतर हलके हलके केळे आणि व्हॅनिलाच्या लाटा जिभेवर सुरसुरून गेल्या !” केक ला मऊसर वेष्टन होते आणि ते चाखताना लोणी साखरेच्या मधुर गुदगुल्या जिभेला सुखावून गेल्या !……” इ.

     जिल एकदम खुलली. मुळात ‘मऊ लोण्यहूनी असलेली जिल साखर विरघळेल अशी हसली आणि केक- केकचे प्रकार- कृती पुस्तक या बद्दल भरभरून बोलू लागली…

     जिलचा नवरा सैन्यात (नेव्हीत) केव्हातरी ‘कोरोनाडो’ च्या मोक्याच्या बेटावर नेमणूक होऊन दोघे इथे आले. मग कधी जपानला कधी बोस्टनला….. अशी भटकंती करत आता निवृत्तीनंतर कोरोनाडोला छोटसं घर घेऊन इथेच विसावले.

    जिलला स्वयंपाक –पाककृती यांची आवड. साधारणपणे अमेरिकन महिला ‘सोयपूर्णा’ म्हणजे सोययुक्त स्वयंपाकघरे असलेल्या असल्या तरी अन्नपूर्णा नसतात. त्यांचा ‘स्वयंपाक’ म्हणजे काहीतरी ‘फिक्स’ करणं असतं. (लेट मी फिक्स अ सॅडविच फॉर डिनर ! इ. ) त्यामुळे हे मला नवलपूर्णच वाटलं.

    स्वयंपाकघरात विविध प्रयोग करत तिने केक च्या कृती तयार केल्या. मग त्यातून पुस्तक तयार झाले, “केक, आय लव्ह यू !”- लोकांना काही पदार्थ खूप आवडतात काही कमी. त्यामुळे केकच्या पुस्तकाचे तिने पदार्थानुसार भाग पडले. उदा. केळे. – मग त्यात केळ्याच्या केकच्या कृती. प्रथम करायला सोप्या मग गुंतागुंतीच्या…..वेगळेपणामुळे लोकांना हे पुस्तक चटकन घ्यावेसे वाटते. नाहीतर बाजारात केकची हजारो पुस्तके नि गुगलवर हजारो कृती !

     आता हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचावे कसे असा विचार करतांना केशकर्तनालयाच्या संचालिका असलेल्या मैत्रिणीने सुचवले की रविवारी दुपारी दुकान बंद असते. पर्यटकांच्या झुंडी या रस्त्याने जातात, तेव्हा असा पुस्तक स्वाक्षरी-विक्रीचा अभिनव कार्यक्रम करावा ! कादंबरी लिहिणारा लेखक अशा स्वाक्षरी कार्यक्रमात नमुना कादंबरीतले उतारे वाचतो- मग केककृती लिहिणाऱ्या लेखिकेने केकचे नमुने चाखायला द्यावेत !”

    हा अभिनव कार्यक्रम चविष्ट आणि लज्जतदार व्हायला आणि पुस्तक विक्री व्हायला वेळ नाही लागत.

     “केक कृतीच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम/ क्लास केलेस तर मी येईन –कारण ‘बेकिंग’ या प्रकारात मी अनभिज्ञ आहे. मी तिला म्हणाले.- तिला ही कल्पना आवडली….

    जिलने हे सहावे पुस्तक… या आधीची चार पुस्तके गोड पदार्थांना वाहिलेली आहेत, तर एकात गोडाबरोबर काही तिखट, खारे पदार्थ (अर्थात चटकदार आहेत) एका पुस्तकात लहान मुलांसकट सर्व कुटुंबासाठी पाककृती आहेत ! तर एकात ईस्टरसाठी रंगवण्याच्या अंडाकृतीसह अनेक गंमती जंमतीच्या कल्पना !

     आणि हो, एक पुस्तक आहे खास ‘फ्रेंच पेस्ट्री’ बर ! नवलपरीच्या फ्रेंच पेस्ट्रीज म्हणजे फ्रेंच पाकतज्ञ (शेफ) आणि खाद्यतज्ञ यांची खासीयत !

     ‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ हे खरं असलं तरी, ‘साखर खाणाऱ्याला कधीकधी ‘मधुमेह’ होणार हेही होऊ शकतं. त्यामुळे कमी साखरेचे किंवा विना साखरेचे पदार्थ कसे करावे याबद्दलचं जिलचं “स्वीट नथिंग” हे पुस्तकही लोकप्रिय आहे !

     प्रत्येक पुस्तकात सुरवातीला कोणते भांडे कशासाठी योग्य यांचं मार्गदर्शन. कृतीसाठी वापरण्याच्या पदार्थांची माहिती आणि योग्य पदार्थ वापरण्याची माहिती आहे. बारीक सारीक सूचना आहेत. नवशिक्यांना प्रोत्साहन आणि बुजुर्गांना बारकावे सांगणारी तंत्रे !

     पदार्थांच्या सोप्या कृती आधी आणि ते करत करत हळूहळू अवघड वळणे घेत पारंगत होण्याच्या गुरुकिल्ल्या आहेत.

     चुलीवरच्या भांड्यात आधी अंडी घालून मग त्यात हळूहळू साखर मिसळा- उलटे केले तर साखरे बरोबर अंडी जळतात.

     चॉकलेट मध्ये किंचित कॉफी मिसळा आणि लज्जत वाढवा.

     केकचे मिश्रण घट्ट झालेसे वाटले तर गरम पाणी घालत ते पातळसे करा. (गार पाणी नको).

     केकचे फ्रॉस्टिंग एक दिवस आधी करा.

     केक बनवणे अगदी सोपे – पण ‘लेअर’ म्हणजे बहुपदरी केक बनवणं ही कला आहे बरकां !

     आणि फ्रेंच पेस्ट्री बनवणं खर म्हणजे आपला पाय बनवण्या इतकं सोपं असतं- पण फ्रेंच पेस्ट्री बनवून तुम्ही एकदम ‘इंप्रेशन’ मारू शकता !

     अशा खाचा खोचा पुस्तकात जागोजागी दिसतात – आणि सजावटीसह केक आणि पदार्थांची सुंदर छायाचित्रे ! पुस्तकातला प्रत्येक पदार्थ जिलच्या कृतीनं सजीव होऊन तर येतोच पण तो तिच्या ह्रदयातून येतो !

     तिचं पाककृती प्रेम आणि ‘टेंडर लिव्हिंग केअर’ पानोपानी दिसते ! जिलशी बोलतांना सतत जाणवतं की तिचं पदार्थावर, तिच्या खास खास पाककृतींवर अगदी अपत्यवत प्रेम आहे !

    जिलला पाककृतीत  लहानपणापासून रस – त्यात अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे ‘सॅन होजे’ – कॅलिफोर्नियाचा उमदेपणा, अघळपघळपणा व्यक्तिमत्वात उतरलेला !

     मुळात इंग्लिश घेऊन बी.ए झालेली जिल लग्न होऊन नवऱ्याबरोबर  इंग्लंडला गेली ती आपल्या व्यक्तिमत्वाला (आणि रसनेला) पोषक अशा कुकिंग स्कूलमध्ये ! इंग्लंडमध्ये तिला ब्रिटीश पदार्थांमध्येही गोडी वाढली. एका कंपनीत ती मुख्य पाकतज्ञ झाली आणि कंपनीच्या खाद्यपदार्थांचा दर्जा उंचावण्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले. ‘गोल्डन डोअर, स्पा’ या प्रख्यात कंपनीत ती ‘पेस्ट्री शेफ’ म्हणून काम करू लागली.

     व्हाईट हाउसच्या पेस्ट्री शेफ बरोबर शिकण्याची संधीही तिला मिळाली. एवढं सारं ‘मधुर’ करिअर तिनं आपल्या गोजिरवाण्या मधुर मुलीच्या संगोपनासाठी बदललं आणि मग ती संसार सांभाळून पाककृती करणे, पुस्तके लिहिणे, मासिकात लिहिणे हे करू लागली नवऱ्याची फिरती असल्यामुळे आपले स्वयंपाकघर आपल्या पाठीवर घेऊन हिंडता हिंडता तिने ‘पेस्ट्री तज्ञ’ म्हणून पुष्कळ यश मिळवले आणि आता कोरोनाडो या चिमुकल्या बेटावर ती मजेत पेस्ट्री आणि केक लोकांना खिलवते आहे !

     तिच्या पुस्तकातला एकतरी केक करून अनुभवण्याच भरघोस आश्वासन देऊन मी तिचा निरोप घेतला आणि माझ्या सारख्या नवशिक्यांसाठी केक बनवण्याचे वर्ग सुरु करण्याचं आश्वासन देऊन जिलने मला प्रेमळ निरोप दिला !

    तो केक घेऊन मी हॉटेलवर आले. मस्त कॉफी बनवली. ..खिडकीशी असलेल्या टेबलावर कॉफी चा वाफाळता कप आहे. समोर कोरोनाडोचा पूल आणि समुद्र ! कॉफीच्या कडवट चवी मागून केक मधल्या बदामाची चव जिभेवर अलगद विसावते आहे आणि केकच्या मधला गोडीचा मुलायम लेप जिभेला सुखावून जातो आहे !

     या केकवर खरोखर शतदा प्रेम करावे !

                                      -विद्या हर्डीकर सप्रे.